गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन; कॉन्टिनेन्टल हाइट्स इमारतीवर संशय, मात्र अंडी नेमकी कुठून फेकली याचा अद्याप उलगडा नाही
मुंबईतील माझगाव परिसरात गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यादरम्यान अंडी फेकल्याच्या आरोपामुळे रविवारी रात्री तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. 23 ऑगस्ट रोजी ‘माझगावचा मोरया’ गणपतीच्या आगमनावेळी हा प्रकार घडल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. घटनेनंतर संतप्त गणेशभक्त आणि तरुणांनी आंदोलन करत निषेध नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, रात्री तब्बल मध्यरात्री 3 वाजेपर्यंत माझगाव परिसरात दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण होते.
गणेश मंडळ आणि भक्तांकडून कॉन्टिनेन्टल हाइट्स या इमारतीतून अंडी फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अंडी नेमकी कोणत्या ठिकाणाहून आणि कोणी फेकली, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्व शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Heavy police security deployed in Mumbai’s Mazgaon area after Ganesh festival organisers alleged that eggs were hurled at their procession during the idol's arrival. pic.twitter.com/nGqunMrpu9
— ANI (@ANI) August 24, 2026
अंडी फेकल्याच्या आरोपानंतर आंदोलन
‘माझगावचा मोरया’ गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी फेकण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली. त्यानंतर रात्री आंदोलन करत या प्रकाराचा निषेध करण्यात आला.
घटनास्थळाच्या आसपास तीन ते चार मोठ्या इमारती असल्याने अंडी नेमक्या कोणत्या इमारतीतून फेकण्यात आली, याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. गणेश मंडळ आणि भक्तांकडून एका विशिष्ट इमारतीवर संशय व्यक्त करण्यात येत असला, तरी पोलिसांनी कोणत्याही एका निष्कर्षापर्यंत न पोहोचता सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या डिटेक्शन टीमकडून करण्यात येत आहे. परिसरातील विविध इमारतींमध्ये जाऊन पोलिसांकडून चौकशी केली जात असून, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अंडी नेमकी कुठून फेकण्यात आली आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून घटनाक्रमाची बारकाईने पडताळणी केली जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके सत्य समोर येणार आहे.
14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात
दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मुंबईत सुमारे 10,600 सार्वजनिक गणेश मंडळे असून, त्यापैकी केवळ 2,500 मंडळांनी 10 दिवसांच्या गणेशोत्सवासाठी परवानगी घेतली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात यंदा सुमारे 28 लाख गणेशमूर्तींची स्थापना होण्याचा अंदाज आहे. मुंबईतील गणेश मंडळांना परवानगी मिळण्यासाठी ऑनलाइन सिंगल-विंडो प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून बीएमसीसोबतच स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांची ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) ऑनलाइन मिळवता येणार आहेत.
गणेश मंडळांना परवानगीसाठी 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. माझगावमधील ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेकडे पोलिसांचे विशेष लक्ष असण्याची शक्यता आहे.