मुंबईत तरुणाचे रक्त सांडल्यास 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद करण्याचे वक्तव्य; शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. सरकारकडून मागण्यांबाबत जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी मराठा समाजातील असंतोष वाढत असल्याचे म्हटले आहे. सरकारला 12 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला असून, त्या दिवशी राज्यभरातील मराठा समाजाने अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना मागील वर्षभरात मराठा समाजाच्या मागण्यांवर अपेक्षित निर्णय घेण्यात आला नसल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मार्च आणि फेब्रुवारीमध्ये प्रसाद लाड यांनी सरकारकडे बोलावण्याची तयारी दर्शवली होती. तसेच देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करतील, असेही सांगण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर लाड यांना बोलावण्यात आले होते; मात्र वर्षभरात ठोस कार्यवाही झाली नसल्याचे जरांगे यांनी म्हटले.
शिंदे-फडणवीसांवर जरांगेंचे आरोप
आंदोलन मुंबईकडे गेल्यानंतर त्यावर हल्ला होण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. शिंदे-फडणवीस यांच्यात मिलीभगत असल्याचा दावा करत त्यांनी शिंदे गटातील दोन मंत्री आणि दोन प्रवक्ते आंदोलन कमकुवत करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले.
मुंबईच्या दिशेने मराठा आंदोलक निघाल्यानंतर हल्ला करून त्याची जबाबदारी फडणवीसांवर टाकण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. बावनकुळे आणि त्यांच्या समर्थकांकडूनही अशाच प्रकारच्या हालचाली सुरू असल्याचे जरांगे यांनी म्हटले. आंदोलन मोडीत काढण्यासाठी काही पत्रकारांच्या माध्यमातून सल्ले घेतले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
12 सप्टेंबरला अंतरवालीत जमण्याचे आवाहन
मनोज जरांगे यांनी 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटीत मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, नगर आणि नाशिकसह विविध जिल्ह्यांतील गावागावातून मराठा समाजाने प्रत्यक्ष अंतरवाली सराटीत यावे, असे त्यांनी सांगितले.
आंदोलनासाठी आतापर्यंत लोक आले नाहीत तरी चालेल; मात्र 12 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणे महत्त्वाचे असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्या दिवशी केवळ 10 लोक उपस्थित असले तरी मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुंबईतील परिस्थितीबाबत जरांगेंचा इशारा
मुंबईत आंदोलनादरम्यान एखाद्या तरुणाला इजा झाली किंवा रक्त सांडले, तर अवघ्या 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असे वक्तव्य जरांगे यांनी केले. फडणवीसांनी आंदोलनावर हल्ला घडवून आणल्यास राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
पोलिसांकडून हल्ला झाल्यास आंदोलकांनी पळून न जाता सावध राहावे, असे आवाहन करताना त्यांनी चेंगराचेंगरीची शक्यता व्यक्त केली. मुंबईत सावध राहण्याचा उल्लेख करत त्यांनी पावनखिंडीतील मावळ्यांचे उदाहरण दिले आणि स्वसंरक्षणासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. सरकारला परिस्थितीचे गांभीर्य समजत नसेल तर नाईलाज असल्याचेही जरांगे यांनी म्हटले.