गंगाखेड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल...!
परभणी (Parbhani molestation case) : गंगाखेड येथे शेतातून घराकडे परतणाऱ्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी पालम येथील कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवल्याचा निकाल गंगाखेड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. बावस्कार यांनी शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी दिला आहे.
शेतातून घराकडे परतणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेचा १७ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रस्त्यात उभा असलेल्या नागोराव उर्फ नागनाथ भिमराव लांडे याने पाठीमागून येऊन गळा धरत विवाहितेला खाली पाडले तेंव्हा डोक्यावरील टोपलं पडल्याने विवाहिता ओरडली असता वाईट उद्देशाने आरोपी विवाहितेस ओढत असल्याने तिने आरडा ओरडा करताच त्याने पळ काढल्याची घटना घडल्याने त्याच दिवशी पालम पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून पालम न्यायालयात दोषारोप दाखल केले असता दि. ८ एप्रिल २०१९ रोजी पालम न्यायालयाने आरोपी नागोराव उर्फ नागनाथ भिमराव लांडे रा. शिरपूर ता. पालम यास कलम ३५४ अन्वयेच्या गुन्ह्यात एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच कलम ३५१-अ (२) अन्वये ६ महिन्याचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावत कलम ३२३ अन्वये एक महिना सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
याविरुद्ध आरोपी नागोराव उर्फ नागनाथ भिमराव लांडे रा. शिरपूर ता. पालम याने गंगाखेड येथील जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. बावस्कार यांच्या न्यायालयात अपिल केले असता या आपिलात न्यायाधीश जी.पी. बावस्कार यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत कनिष्ठ न्यायालयाने दिलेली आरोपीची शिक्षा कायम ठेवत दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या असा आदेश शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात दिला आहे.
या (Parbhani molestation case) प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता डी.यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.बी. पौळ यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी. वाकोडकर, पालम पोलीस ठाण्याच्या कोर्ट पैरवीकार मपोह श्रीमती लिना व्ही. मुंढे, पिंपळदरी पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरवीकार सपोउपनि जे.एच. पठाण, मपोशि श्रीमती स्नेहल एस. जिंकलवाड, कोर्ट पैरवीकार एम.डी. कुंडगीर यांनी सहकार्य केले.