पाथरी येथे होणार दफनविधी; व्यापारी महासंघाकडून दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली
परभणी (Shergul Khan passed away) : हिंगोली विधानपरिषद आमदार सईद खान यांचे वडील तथा पाथरी शहरातील ज्येष्ठ नागरिक शेरगुल खान उर्फ बिरबल खान (वय ८५) यांचे शनिवारी (११ जुलै) सायंकाळी मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पाथरी शहरासह परिसरात शोककळा पसरली असून, व्यापारी महासंघाने श्रद्धांजली म्हणून रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शेरगुल खान उर्फ बिरबल खान (Shergul Khan passed away) हे पाथरी शहरात "चाचा" या नावाने परिचित होते. त्यांच्या मनमिळावू, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावामुळे समाजातील विविध स्तरांतील नागरिकांमध्ये त्यांना विशेष मान होता.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विधानपरिषद आमदार सईद खान, पाथरी नगराध्यक्ष आसेफ खान तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मेहराज खान यांचे ते वडील होत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१२ जुलै) दुपारी २ वाजता पाथरी येथे त्यांच्यावर दफनविधी करण्यात येणार आहे.दरम्यान, त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय, सामाजिक, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. पाथरी व्यापारी महासंघाच्या वतीने श्रद्धांजली म्हणून शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून दिवंगत शेरगुल खान उर्फ बिरबल खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.