दुचाकींचे टायर अडकून अपघाताचा धोका; महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष!
लातूर : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील लातूर ते औसा रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये दुचाकींचे टायर अडकून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष होत असून, महामार्गाची डागडुजी तकलादू पद्धतीने केली जात असल्याचे चित्र आहे.
नांदेड शहरातील विष्णुपुरी येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत कोसळण्याची घटना घडल्यानंतर या महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भिंत कोसळण्यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भेगा आणि खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील लातूर ते औसा मार्गावर तावरजा नदीच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे गेल्या आठवड्यातच बुजविण्यात आले होते. मात्र, अवघ्या सात ते आठ दिवसांत पुन्हा हे खड्डे उघडे पडले आहेत. याच ठिकाणापासून औसा शहराच्या दिशेने सारोळा पाटीपर्यंत महामार्गाच्या दोन लेनमध्ये सरळ मोठी भेग पडली आहे.
सातत्याने भेगा पडत असताना थातूरमातूर दुरुस्ती केली जात असल्याचे दिसून येते. मात्र, ही भेग इतकी मोठी आहे की, त्यावरून दुचाकीचे चाक गेल्यास ते थेट भेगेमध्ये अडकून अपघात होण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, वाहन वेगात असताना अशा भेगा पडलेल्या ठिकाणी लेन बदलणेही दुचाकीस्वारांना कठीण जात आहे.
खड्ड्यामुळे कार पुलावर धडकली
आठ दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील तावरजा नदीवरील पुलावर असलेल्या खड्ड्यामुळे कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार पुलाच्या कठड्याला धडकून एका बाजूला उभी राहिली. सुदैवाने पुलाची तटभिंत असल्याने कार नदीत कोसळण्याचा धोका टळला.
निकृष्ट बांधकामामुळे भेगा?
नांदेड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (एनएच-३६१) पडणाऱ्या भेगा आणि रस्ता खचण्याच्या घटनांमागे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, मातीची योग्य पद्धतीने न झालेली भरावणी आणि मुसळधार पावसामुळे पाण्याचा योग्य निचरा न होणे ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
नियम डावलून कंत्राटदाराकडून सिमेंट-काँक्रीट आणि मुरमाची कामे केली गेल्याने तसेच मातीची असमतोल भरावणी झाल्याने महामार्गाच्या दोन लेनमध्ये भेग पडून अंतर निर्माण झाले आहे. तावरजा नदीवरील जुना पूल संपल्यानंतर औसा शहराच्या दिशेने असलेल्या रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नाही. पावसाचे पाणी या ठिकाणी मुरल्याने भुसभुशीत झालेली माती सरकून रस्त्यावरील भेग आणखी मोठी होत आहे.
या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यात अवजड वाहनांमुळे पाणी मुरलेल्या ठिकाणी अधिक माती सरकून रस्त्यावरील भेगांचे प्रमाण वाढत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. कंत्राटदाराच्या भरोशावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हा खरा सवाल आहे.
छत्रपती चौकानजीकही भेगा!
अलीकडेच नांदेडमधील विष्णुपुरीजवळ पुलाचा भाग आणि भिंत खचून कोसळण्याच्या घटनांमुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय महामार्गावर इतरत्रही अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत.
लातूर शहरातील औसा बायपासवरील छत्रपती चौकापासून वासनगाव येथील थोरमोटे पेट्रोल पंपासमोरही महामार्गावर भेगा पडल्या आहेत. या भेगा बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता राजीव गांधी चौक ते छत्रपती चौक या रस्त्यावरही पहिल्याच लेनमध्ये भेगा पडल्याचे हळूहळू स्पष्ट दिसून येत आहे.