कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई : गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक असताना मुंबई आणि परिसरातून हजारो कोकणवासीय गावाच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, उत्सवासाठी घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना प्रवासाच्या सुरुवातीलाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बिघाड झाल्याने काही गाड्या तब्बल १२ तास उशिराने धावत आहेत, तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईतील हजारो नागरिक कोकणात जातात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेकडून विशेष गाड्या चालविल्या जातात. मात्र, तिकिटांची उपलब्धता अपुरी पडल्याने अनेक प्रवाशांना रस्ते मार्गाचा पर्याय स्वीकारावा लागतो. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून मोफत अतिरिक्त एसटी बससेवाही उपलब्ध करून दिली जाते. यंदाही मोठ्या संख्येने अशा बस कोकणाच्या दिशेने रवाना झाल्याने महामार्गावरील वाहतुकीवर अतिरिक्त ताण पडला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ३०० हून अधिक अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येत आहेत. मात्र, या वाढीव सेवांचा परिणाम नियमित रेल्वे वाहतुकीवर झाल्याचे दिसून येत आहे. नियमित गाड्या साधारण दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. त्याचवेळी काही गणपती स्पेशल गाड्यांनाही तब्बल दहा ते बारा तासांचा विलंब होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
रत्नागिरी स्थानकात कोइंबतूर एक्सप्रेस तब्बल १२ तास उशिराने दाखल झाली. कोकण कन्या एक्सप्रेस ३ तास १७ मिनिटे, तुतारी एक्सप्रेस ३ तास, जनशताब्दी एक्सप्रेस दीड तास, तर सावंतवाडी एक्सप्रेस तब्बल ६ तास विलंबाने धावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नियोजित वेळेनुसार प्रवासाचे नियोजन केलेल्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेल्वेप्रमाणेच रस्ते मार्गावरही परिस्थिती बिकट झाली आहे. मुंबई आणि परिसरातून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विविध राजकीय पक्षांनी मोफत एसटी बससेवा सुरू केली आहे. मात्र, या बस मोठ्या संख्येने एकाच वेळी गावांच्या दिशेने निघाल्याने महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
मुंबई-गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी एसटी बस तसेच खासगी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडली आहेत. परिणामी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना विलंबाचा सामना करावा लागत आहे, तर रस्ते मार्ग निवडणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांसाठी यंदाचा प्रवास त्यामुळे सुखकर होण्याऐवजी त्रासदायक ठरत आहे. रेल्वेच्या लेटमार्कसोबतच महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे गणेशभक्तांना दुहेरी अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रवासातील या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये मनस्तापाचे वातावरण आहे.