अपंग करण्याच्या प्रयत्नापासून हत्येपर्यंतचा घटनाक्रम; ChatGPT, क्राईम पॉडकास्ट आणि बनावट ‘माही’ अकाऊंटचा वापर केल्याचा तपासातील दावा
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात तब्बल ५०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तपासात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे या तिन्ही आरोपींच्या कथित कटाचा घटनाक्रम समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह विविध पुरावे संकलित केल्याचे सांगितले आहे.
मार्चपासून केतनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न
पोलिस तपासानुसार, केतनला रस्त्यातून हटवण्याचा विचार मार्च २०२६ पासून सुरू झाला होता. सुरुवातीला त्याचा खून करण्याऐवजी त्याला गंभीर दुखापत करून कायमचे अपंग करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे.
यासाठी परराज्यातील व्यक्तीशी संपर्क साधून त्याला सुपारी देण्याचा प्रयत्न झाला. अनेक व्यक्तींशी संपर्क झाल्यानंतर बाहेरील व्यक्ती पकडली गेल्यास अडचण निर्माण होईल, या कारणामुळे हा पर्याय सोडण्यात आला. ज्या व्यक्तीशी सुरुवातीला संपर्क साधण्यात आला होता, तोच या प्रकरणात पोलिसांचा प्रमुख साक्षीदार झाल्याचे तपासात नमूद आहे. त्यानंतर मे महिन्यात तिघांनी स्वतःच केतनची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे.
ChatGPT आणि क्राईम पॉडकास्टचा वापर केल्याचा दावा
हत्येनंतर पोलिसांच्या तपासापासून बचाव कसा करायचा आणि पुरावे नष्ट करण्याच्या पद्धती काय असू शकतात, यासाठी आरोपींनी ChatGPTसह AI टूल्सचा वापर केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
याशिवाय विविध मर्डर सिनेमे पाहणे, क्राईम पॉडकास्ट ऐकणे तसेच मेघालयातील चर्चेत आलेल्या ‘सोनम केस’चा अभ्यास केल्याचेही दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
टायगर पॉईंटनंतर लोहगडची निवड
२९ मेच्या सुमारास सिया आणि चेतन यांनी लोणावळ्यातील टायगर पॉईंटची पाहणी केली. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचे तपासात नमूद आहे. त्यानंतर लोणावळ्यातील इतर डोंगराळ भागांचीही पाहणी करण्यात आली आणि अखेर लोहगडाची निवड करण्यात आली.
मार्च २०२५ मध्ये लोहगडावर एका महिलेचा दरीत पडून मृत्यू झाला होता. या घटनेचा संदर्भ घेत केतनचा मृत्यू सेल्फी घेताना तोल जाऊन दरीत पडल्याने झाला, असा बनाव करता येईल, अशी आरोपींची कथित योजना होती.
बाली दौरा रद्द करण्यासाठी पासपोर्ट फाडल्याचा आरोप
६ जून रोजी सिया आणि केतन प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. मात्र त्यापूर्वी केतनला संपवण्याची योजना असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
४ जूनला सियाने लोहगडावर जाण्याचा आग्रह केला. बालीला जाण्यापूर्वी खालापूरमधील एका कॅफेच्या वॉशरूममध्ये केतनचा पासपोर्ट फाडून टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे त्यांचा बाली दौरा रद्द झाला.
त्यानंतर १४ जूनला सिया आणि केतन लोहगडावर गेले. तेथे केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर साप आल्याचे भासवून केतनला घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचाही तपासात उल्लेख आहे.
बनावट ‘माही’ अकाऊंटमधून केतनला लोहगडावर बोलावले
पहिले प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर रितेश हांगेने पुढील योजना आखल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिघांनी मिळून एका ओळखीच्या मुलीचा फोटो वापरून ‘माही’ नावाचे बनावट Instagram अकाऊंट तयार केले.
१८ जूनला या अकाऊंटवरून केतनला संदेश पाठवण्यात आला. सियाची मैत्रीण असल्याचे भासवत लोहगडावर सियाला सरप्राईज देण्यासाठी येण्यास सांगण्यात आले. या संदेशानंतर केतन सियासोबत लोहगडावर पोहोचला.
लोहगडावर केतनचा मृत्यू
पोलिसांच्या तपासानुसार, चेतन चौधरी आधीच दुसऱ्या मार्गाने लोहगडावर पोहोचला होता. सियाने त्याला संकेत दिल्यानंतर तो मंदिराजवळ थांबला. त्यानंतर केतन दरीच्या कडेला असताना सिया आणि चेतनने त्याला खाली ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत केतनचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बनावट ‘माही’ Instagram अकाऊंट डिलीट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणातील तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य तपासाच्या आधारे पुणे ग्रामीण पोलिसांनी ५०५३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.