सखोल चौकशीची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
मानोरा (Gram Panchayat Financial Irregularity) : तालुक्यातील गट ग्रामपंचायत वापटा, हट्टी मध्ये सन १ ऑक्टोबर २०२२ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील विविध विकास कामे, शासकीय निधीचा वापर, शासकीय योजनांची अंमलबजावणी व प्रशासकीय कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी दि. २१ सप्टेंबर गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत वापटा (Gram Panchayat Financial Irregularity) येथील ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ग्रामपंचायतीची विविध विकासकामे, शासकीय निधीचा वापर, शासकीय रोजगारांची अंमलबजावणी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवकांची उपस्थिती तसेच ग्रामपंचायतीच्या आर्थिक व प्रशासकीय कारभाराबाबत ग्रामस्थांकडून गंभीर तक्रारी करण्यात आले असुन सदर तक्रारींची सविस्तर व कागदोपत्री तपासणी न करता मुक्त अभियांत्रिकी तपासणी, संबंधित अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा जबाब, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मंजूर निधी व प्रत्यक्ष खर्चाची पडताळणी तसेच बँक व्यवहार, बिले व देयकांची तपासणी करून निष्पक्षपणे सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
१५ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधी, मंजूर कामे, कामांची निवड, ग्रामपंचायत ठराव, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रक, कार्यारंभ, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), बिले, देयके व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी. मंजूर निधी, कागदोपत्री दर्शविलेला खर्च व प्रत्यक्ष झालेल्या कामाचे तथ्य यात तफावत असल्याची तसेच निधीची वाटपामध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची ग्रामस्थांची तक्रार असून, त्याची सखोल पडताळणी करण्यात यावी, आर. ओ. फिल्टर / शुद्ध पाणी पुरवठ्याच्या घरघुती योजना, दरपत्रक/निविदा, पुरवठादार, खरेदी आदेश, बिले, प्रत्यक्ष बाजारभाव, करण्यात आलेले देयक, बसविण्याचे ठिकाण, देखभालीची कार्यस्थिती व देखभाल खर्च यांची तपासणी करण्यात यावी.
सदर योजनेच्या खरेदीमध्ये प्रचलित बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केल्याची व जास्त रकमेची बिले लावल्याची तक्रार असून, यामध्ये आर्थिक अनियमितता झाली आहे किंवा नाही, याची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, पाणीपुरवठा, जल जीवन मिशन, दलीत वस्ती विकास योजना यासह विविध संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निःपक्ष चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी सतिष खंडू चव्हाण, राम कैलास चव्हाण, विशाला नामदेव राठोड, दिपक सुभाष चव्हाण, परमेश्वर किसन राठोड, पुरुषोत्तम शेषराव चव्हाण, रुपेश सुभाष चव्हाण, श्रीकांत सुरेश चव्हाण, लखन कैलास चव्हाण, माधव वासुदेव चव्हाण आदीसह इतरांची उपस्थिती होती. या तक्रारीमुळे ग्रामपंचायत वापटाच्या कारभाराची पोलखोल होणार असून प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.