गणेश मंदिराजवळील घाटावर पायऱ्या नाहीत; पावसामुळे वाढलेल्या गवतामुळे घसरण्याची भीती, नगरपंचायतीकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
मानोरा : गणेशोत्सवाची सांगता जवळ आली असून मानोरा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशभक्त बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत आहेत. मात्र, गणेश विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या घाटावर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मानोरा शहरातील गणेश मंदिराजवळील घाटावर दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यंदाही याच ठिकाणी मोठ्या संख्येने गणेशभक्त आणि गणेश मंडळांकडून विसर्जन केले जाणार आहे. मात्र, विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घाटाची आवश्यक व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नसल्याची तक्रार भाविकांकडून होत आहे.
विशेषतः मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात खाली घेऊन जाताना भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. घाटावर अद्याप पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यातच पावसामुळे घाटाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे मूर्ती घेऊन नदीपात्राकडे जाताना पाय घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विसर्जनाच्या वेळी एखाद्या भाविकाचा पाय घसरून दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे. बाप्पाला निरोप देण्याच्या या धार्मिक सोहळ्यात सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने गणेश घाटावरील पायऱ्यांची दुरुस्ती व आवश्यक व्यवस्था करावी, वाढलेले गवत काढून परिसराची स्वच्छता करावी, पुरेशी प्रकाशयोजना करावी तसेच विसर्जनासाठी आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शहरातील गणेश मंडळे आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.
बाप्पाच्या विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच गणेश घाटावरील गैरसोयी दूर करण्याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.