शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण संपले
खानापूर चित्ता : परिसरात पिसाळलेल्या अवस्थेत फिरणाऱ्या एका कोल्ह्याने नागरिकांसह जनावरांना चावा घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी कैलास पाईकराव यांच्या नाकाला तर अर्जुन पवार यांच्या पायाच्या मांडीला चावा घेतल्याने दोघेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे उपचार घेत आहेत. त्याचबरोबर विठ्ठल शहाजी जाधव यांच्या जनावरांना चावा घेतला होता. सदरील जनावरांना औषध उपचार केले असून जनावर सुखरूप असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जनावरांच्या गोठ्याजवळ आलेल्या या कोल्ह्याने बैलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क झालेल्या बैलाने जोरदार लाथ मारल्याने कोल्हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून परिसरात एक कोल्हा पिसाळलेल्या अवस्थेत फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. दिवसा तसेच रात्रीच्या वेळी तो मानवी वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी आपल्या जनावरांची विशेष काळजी घेत होते.
दरम्यान, संबंधित कोल्हा एका शेतातील जनावरांच्या गोठ्याजवळ पोहोचला. त्याने बैलाच्या दिशेने धाव घेत झडप घालण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बैलही आक्रमक झाला आणि त्याने कोल्ह्याला जोरदार लाथ मारली. या लाथेमुळे कोल्हा गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.