औसा : तालुक्यातील उजनी येथे ४६ वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून आपल्या शेतातील कोठ्यास गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. श्रीमंत बिभीषण वळके (वय ४६ वर्षे, रा. उजनी, ता. औसा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे उजनी परिसर आणि भादा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत श्रीमंत वळके यांच्या नावावर विविध कार्यकारी सोसायटीचे ५६ हजार रुपयांचे कर्ज होते. त्यातच मागील दीड महिन्यापासून पावसाने संपूर्णपणे दडी मारल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके डोळ्या देखत जळून चालली होती. पेरणी आणि फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेल्याने आणि मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज व लोकांचे उसने घेतलेले पैसे कसे परत करायचे, या मोठ्या आर्थिक विवंचनेत ते मागील महिनाभरापासून होते.
याच सततच्या मानसिक तणावातून त्यांनी शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:४५ वाजेच्या सुमारास उजनी शिवारातील स्वतःच्या शेतातील कोठ्याच्या आडूला लाल रंगाच्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मयताचे भाऊ बळवंत विभीषण वळके (वय ४८ वर्षे) यांनी भादा पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या खबरीवरून भादा पोलीस स्टेशन येथे आ.मृ.नं. 36/2026, कलम १९४ बीएनएसएस अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपासाची चक्रे फिरली असून, दाखल अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ) एम. एम. तांबरे यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस हवालदार शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
कर्जबाजारीपणा आणि निसर्गाची अवकृपा यामुळे आणखी एका बळीराजाला आपले प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण औसा तालुका आणि परिसरात शोककळा पसरली आहे.