विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप; माहूर पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद
माहूर : तालुक्यातील लसनवाडी येथे हनुमान मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत पडून ११ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. समर्थ विकास राठोड असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह रात्री सुमारे १२ वाजता विहिरीबाहेर काढण्यात आला.
या घटनेमुळे लसनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सार्वजनिक विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत मुलाचे वडील विकास खंडू राठोड यांनी माहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनानुसार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते घरी असताना गावातील काही लहान मुलांनी त्यांच्या भावाची मुलगी नंदिनी हिच्यामार्फत समर्थ हा हनुमान मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत पडल्याची माहिती दिली.
माहिती मिळताच राठोड कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत पाहिले असता पाण्यावर समर्थची चप्पल तरंगताना दिसली. त्यानंतर ग्रामस्थांनी मोटार पंपाच्या सहाय्याने विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने संपूर्ण पाणी काढणे शक्य झाले नाही.
यानंतर ग्रामस्थांनी विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता समर्थ अडकल्याचे आढळून आले. त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टर अक्षय सांगळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
९ ऑगस्ट रोजी समर्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
समर्थच्या दुर्दैवी मृत्यूमुळे राठोड कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले असून, परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक देविदास चोपडे आणि सहायक पोलिस निरीक्षक शरद घोडके यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले.