वाहतुकीच्या बदलाबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले आदेश
हिंगोली (Collector Rahul Gupta) : पोळा व कर हा सणानिमित्त हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी भरणाऱ्या बैलांच्या मोठ्या यात्रेमुळे वसमत ते नागेशवाडी दरम्यानचा रहदारीचा रस्ता दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी काढला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रतिवर्षी प्रमाणे 10 सप्टेंबर रोजी पोळा हा सण साजरा करण्यात येणार असून 11 सप्टेंबर रोजी कर हा सण साजरा होणार आहे. या सणानिमित्त पो.स्टे. कुरुंदा हद्दीतील वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 10,000 ते 15,000 बैलगाड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्यासाठी बैलांचे मालक घेऊन येतात.
त्यामुळे वसमत-औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होते. हा रस्ता राज्य महामार्ग असल्याने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. गर्दीत वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कधी आणि कुठला रस्ता बंद?
वसमत ते पांढरे ते नागेशवाडी पर्यंतचा रहदारीचा रस्ता हा 10 सप्टेंबर रोजी पहाटे 00.00 वाजेपासून ते 11 सप्टेंबर रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी हा आदेश लागू केला आहे.
पर्यायी मार्ग कोणता?
1. नांदेडकडून छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतूक:* नांदेड - वसमत - झिरो फाटा - हट्टा - जवळा बाजार मार्गे नागेशवाडी मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे वळविण्यात येईल.
2. छत्रपती संभाजीनगर कडून नांदेडकडे जाणारी वाहतूक: नागेशवाडी - जवळा बाजार - हट्टा - झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात आली आहे.
या आदेशाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिद्ध करावी, अशा सूचनाही आदेशामध्ये देण्यात आले आहेत.