१६ किलो मांस, कातडी जप्त; पाच ते सहा जणांचा घटनास्थळावरून पोबारा
सेनगाव (Dhangarwadi Deer Hunting) : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारात हरणांची शिकार झाल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. १६ दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत एका झाडाखाली सुमारे १६ किलो हरणाचे मांस तसेच कातडी आढळून आली. वन विभागाने याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच पाच ते सहा जण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
वन विभागाला धनगरवाडी शिवारात हरणांची शिकार (Dhangarwadi Deer Hunting) करून मांस साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक रविवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धनगरवाडी शिवारात दाखल झाले.
पथकाने परिसराची पाहणी केली असता एका झाडाखाली हरणाचे अंदाजे १६ किलो मांस आणि कातडी आढळून आली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. मात्र, याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पाच ते सहा जण वन विभागाच्या पथकाला पाहून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात वन विभागाने जप्त केलेले मांस व कातडी ताब्यात घेतली असून शिकार नेमकी कधी, कुठे आणि कोणत्या पद्धतीने करण्यात आली, याचा तपास सुरू आहे. तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी वन विभागाकडून केली जात आहे.
या (Dhangarwadi Deer Hunting) कारवाईत डॉ. राजेंद्र नाळे, सचिन माने, माधव केंद्रे, गणेश मिसाळ, मुदिराज, केंदळे, घुगे, ढगे, शिंदे, राठोड, कचरे, चाटसे, तनपुरे आदींच्या पथकाने सहभाग घेतला. पसार झालेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. कारवाईमुळे वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कारवाईची शक्यता
हरण हे संरक्षित वन्यजीव असल्याने त्याची शिकार करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार या प्रकरणात संबंधित कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.