हिंगोलीतील खटकाळी हनुमान मंदिर परिसरातील घटना
खानापूर चित्ता (Bori Shikari Deputy Sarpanch Death) : हिंगोली तालुक्यातील बोरी शिकारी येथील रहिवासी तथा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबासाहेब भिवाजी पाईकराव यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने बोरी शिकारी परिसरात शोककळा पसरली आहे.
बाबासाहेब पाईकराव हे गावातील सामाजिक व सार्वजनिक कामात सक्रिय होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी काम करण्याची त्यांची धडपड होती. सध्या ते उपसरपंच म्हणून कार्यरत होते. आगामी काळात गावाच्या विकासासाठी अधिक जबाबदारी स्वीकारून सरपंच होण्याचे स्वप्न त्यांनी मनात बाळगले होते. मात्र, त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी बाबासाहेब पाईकराव हे मिस्त्री काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दिवसभर कष्ट करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांचा अशा प्रकारे अंत झाल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
२३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, पोलिस उपनिरीक्षक काळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, शेख अमजद यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. २४ सप्टेंबर रोजी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. बाबासाहेब पाईकराव यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान २४ सप्टेंबर गुरूवार रोजी मयत बाबासाहेब पाईकराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.