लोखंडी सेंट्रिंगऐवजी सिमेंटच्या पोत्यात भरले कॉलम सावनेर नगरपरिषदेचा सावळागोंधळ
सावनेर (Construction Scam) : नगरपरिषद सावनेर प्रशासनाकडून जनतेच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांमध्ये कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा आणि निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चक्क सिमेंटच्या पोत्यांचा वापर करून कॉलमचे (स्तंभ) काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने इमारतीच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. परंतु प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. तेव्हा हा प्रशासनाचा आंधळेपण की, कंत्राटदाराशी संगनमत !अशा चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
कोणत्याही आरसीसी बांधकामात कॉलम भरताना लोखंडी किंवा लाकडी सेंट्रिंग (फरमा) वापरणे अनिवार्य असते. यामुळे कॉलमला योग्य आकार मिळतो आणि काँक्रिटमधील पाणी शोषले जात नाही, ज्यामुळे कॉलम मजबूत होतो.
मात्र, सावनेर येथील कामात कंत्राटदाराने खर्च वाचवण्यासाठी चक्क सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांचा (बोरी) वापर करून कॉलम भरल्याचे दिसून येत आहे. पोत्यांमुळे काँक्रिटमधील ओलावा योग्यरितीने टिकून राहत नाही, ज्यामुळे कॉलम ठिसूळ होतो. भविष्यात हे निकृष्ट स्तंभ कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जनतेच्या करातून उभारल्या जाणाऱ्या या सोयीसुविधा कंत्राटदाराच्या नफेखोरीमुळे अल्पावधीतच खराब होण्याची भीती आहे.
प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
एकीकडे सरकार दर्जेदार बांधकामाचे दावे करत असताना, स्थानिक नगरपरिषद, संबंधित अभियंता आणि प्रशासन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष कसे करत आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या कामाची तातडीने चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी आणि हे निकृष्ट बांधकाम पाडून पुन्हा नियमानुसार दर्जेदार काम करावे, अशी मागणी सावनेरवासीयांकडून होत आहे.