खेळताना शेजारी उभ्या कारमध्ये गेला; दार न उघडल्याने बराच वेळ कारमध्येच अडकला, उपचारादरम्यान यवतमाळमध्ये मृत्यू
यवतमाळ : घरासमोर खेळत असताना शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा कारमध्येच गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे घडली. अंश सुरज केळझरकर (वय अंदाजे ४ वर्षे) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंश घराच्या परिसरात खेळत होता. खेळता खेळता तो शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेला. मात्र, कारचे दार आतून उघडता न आल्याने तो वाहनातच अडकला. अंश घराजवळच खेळत असल्याचा कुटुंबीयांचा समज असल्याने सुरुवातीला त्याच्या कारमध्ये अडकून पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही.
बराच वेळ उलटूनही अंश दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. घर आणि आसपासचा परिसर पिंजून काढल्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या बंद कारमध्ये तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. कडक उन्हात बराच वेळ बंद वाहनात राहिल्याने त्याचा श्वास गुदमरल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर कुटुंबीयांनी अंशला तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. अंशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी यवतमाळ येथे हलविण्याची आवश्यकता होती. मात्र, सरकारी रुग्णवाहिकाही वेळेवर उपलब्ध झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर सामाजिक कार्यकर्ते मुज्जू पटेल यांच्या खाजगी रुग्णवाहिकेच्या मदतीने अंशला यवतमाळ येथे नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
अंशचे वडील रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अवघ्या चार वर्षांच्या मुलाच्या अशा अकाली निधनाने केळझरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे चिखलवर्धा परिसरासह संपूर्ण घाटंजी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.