धानोरकर गटातील तीन नगरसेवक वडेट्टीवारांच्या गोटात; संख्याबळ १४ विरुद्ध १३
चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्याने गटनेतेपदाची जबाबदारी मिळालेले सुरेंद्र अडबाले यांना पदावरून हटविण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. या घडामोडींमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील तीन नगरसेवक वडेट्टीवार यांच्या गटात सामील झाल्याचे समजते.
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक असून, हा सर्वांत मोठा पक्ष आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा भाजपने घेत सत्ता स्थापन केली. दरम्यान, बुधवारी रात्री धानोरकर गटातील तीन नगरसेवकांना चंद्रपूर शहराबाहेर हलविण्यात आल्याची चर्चा आहे. या घडामोडीनंतर धानोरकर गटाकडे १३, तर वडेट्टीवार गटाकडे १४ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचे समजते.
यापूर्वी खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार या दोन्ही गटांतील नगरसेवकांनी एकत्र येत राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड केली होती. मात्र, स्थायी समितीसाठी धानोरकर गटातील नगरसेवकांची नावे अडूर यांनी दिली नाहीत. त्यानंतर अडूर यांना गटनेतेपदावरून हटविण्यासाठी पक्षातील विरोधी गटाकडून प्रयत्न सुरू झाले.
या संघर्षात अखेर बहुमताचा आकडा गाठण्यात आला आणि १६ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. अडबाले हे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील आहेत. गटनेते बदलण्याचा हा राजकीय संघर्ष जवळपास दीड महिना सुरू होता. हे प्रकरण न्यायालयापर्यंतही पोहोचले होते.
दरम्यान, भाजपमधील अंतर्गत वादामुळे पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर गटनेतेपद बदलून आपल्या गटातील व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून पाठविण्याच्या उद्देशाने आमदार विजय वडेट्टीवार गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
सुरेंद्र अडबाले यांना गटनेतेपदावर विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे काँग्रेसचे नगरसेवक महानंदा वाळके, विनोद लभाने आणि आकाश मानकर यांनी आता खासदार प्रतिभा धानोरकर गटापासून वेगळी भूमिका घेत वडेट्टीवार गटाची साथ दिल्याचे समजते. त्यांच्या भूमिकेतील या अचानक बदलामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बुधवारी रात्री या तिन्ही नगरसेवकांना चंद्रपूर शहराबाहेर हलविण्यात आल्याचेही समजते. गटनेता बदलण्यासाठी साधे बहुमत गृहीत धरल्यास १४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. वडेट्टीवार गटाने आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव केल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदावरून पुन्हा एकदा राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.