‘कामाचा माणूस’ म्हणून असलेली प्रतिमा आली कामी!
बुलढाणा (Jalindar Budhwat) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) या जिल्हास्तरीय मतदारसंघातून जालिंदर बुधवत यांची अविरोध निवड झाली. या मतदारसंघातून तब्बल दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र बुधवत (Jalindar Budhwat) यांच्या कार्यपद्धतीवर आणि सहकार क्षेत्रातील कामावर विश्वास दाखवत इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने ते सहकार पॅनलच्या वतीने अविरोध निवडून आले. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना निर्माण केलेली ‘कामाचा माणूस’ ही ओळख बुधवत यांच्या अविरोध निवडीमागे महत्त्वाची ठरली!
सोयगाव ग्रामपंचायत सदस्य व सरपंच, धाड सोसायटीचे सदस्य व सभापती, तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जिल्हा परिषदेत महिला आरक्षण झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सौ. कमलताई बुधवत यांनी सदस्य तसेच उपाध्यक्ष म्हणून शिक्षण व आरोग्य विभागात काम केले. मासरुळ परिसरात मजबूत पकड असतानाही मासरुळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये विविध आरक्षणांमुळे अनेक वेळा समीकरणे बदलली असली, तरी बुधवत यांची या भागातील संघटनात्मक पकड कायम राहिल्याचे मानले जाते. जिल्हा परिषदेत महिला आरक्षण लागू झाल्यानंतर कमलताई बुधवत यांना संधी मिळाली आणि त्यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणूनही बुधवत (Jalindar Budhwat) यांनी संघटनात्मक पातळीवर काम केले. पक्षातील प्रतिकूल राजकीय परिस्थितीनंतर त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी गावोगावी संपर्क वाढवून नव्या कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची चिखली येथे झालेली सभा आयोजित करण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
विधानसभेची संधी हुकली; मात्र निष्ठा कायम..
२०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी थोडक्यात हुकल्यानंतर २०२४ मध्येही राजकीय समीकरणांमुळे त्यांना अपेक्षित संधी मिळाली नाही. मात्र पक्षाने जयश्रीताई यांना उमेदवारी दिल्यानंतरही बुधवत यांनी पूर्ण ताकदीने प्रचारात सहभाग घेतला. बुलढाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निष्ठेचे जाहीर कौतुक केले होते. मोठ्या निवडणुकांमध्ये स्वतःला उमेदवारी मिळण्याच्या संधी वारंवार हुकत असतानाही संघटनात्मक काम सुरू ठेवणाऱ्या बुधवत यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच जिल्हास्तरीय मोठ्या निवडणुकीत स्वतः लढण्याची संधी मिळाली आणि त्यातही ते अविरोध झाले. या मतदारसंघासाठी त्यांचे सूचक गजानन धांडे होते.
बाजार समितीतील कामाचीही चर्चा..
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात गेल्या दहा वर्षांत झालेल्या बदलाचा संदर्भ देताना बुधवत यांच्या समर्थकांकडून त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाते. पूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होत असलेल्या बाजार समितीत आता नियमित वेतन, तसेच पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या बदलांकडे विशेषत्वाने पाहिले जाते. बाजार समिती, बाजार समितीचा पेट्रोल पंप आणि संबंधित संस्थांचे बँकिंग व्यवहार सुरळीत करण्यासाठी बुधवत यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. सहकार क्षेत्रातील संस्थांच्या व्यवहारांमध्ये समन्वय साधण्याची त्यांची भूमिका राहिली आहे.
जिल्हा बँकेच्या व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण झालेल्या काळातही बँकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहून बँकेच्या कामकाजाबाबत काय सुधारणा आवश्यक आहेत, यावर बुधवत यांनी सातत्याने भूमिका मांडली. त्यामुळे सहकार क्षेत्रात विकासाचा दुवा साधणारा आणि प्रश्नांवर थेट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचा सभापती निवडून आणण्यात तसेच जिल्हा परिषदेत पक्षाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर उपाध्यक्षपद मिळवून देण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
‘कामाचा माणूस’ ही ओळख पुन्हा अधोरेखित..
व्हीजेएनटीच्या जिल्हास्तरीय मतदारसंघातून अनेक दिग्गजांनी उमेदवारी दाखल केलेली असताना बुधवत (Jalindar Budhwat) यांच्यावर विश्वास दाखवत प्रतिस्पर्ध्यांनी उमेदवारी मागे घेणे, ही त्यांच्या राजकीय व सहकार क्षेत्रातील कामाची पावती मानली जात आहे. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना निर्माण झालेला संपर्क, संघटनात्मक अनुभव आणि सहकार क्षेत्रातील कामाचा ठसा या पार्श्वभूमीवर त्यांची जिल्हा बँकेत झालेली अविरोध निवड महत्त्वाची मानली जात आहे. जिल्हा बँकेला नव्या उर्जेची गरज असताना अनुभवी आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जालिंदर बुधवत यांची जिल्हास्तरीय व्हीजेएनटी मतदारसंघातून झालेली अविरोध निवड ही केवळ एका जागेचा निकाल नसून, त्यांच्या दीर्घकाळाच्या कामातून निर्माण झालेल्या विश्वासाची पावती म्हणून पाहिली जात आहे.