भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांचा निर्णय; माउंट मेरी रोडसह अनेक रस्त्यांवर वनवे आणि नो-पार्किंग
मुंबईतील वांद्रे परिसरात १३ ते २० सप्टेंबरदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदलांची नोंद घेणे आवश्यक आहे. माउंट मेरी यात्रेनिमित्त या कालावधीत माउंट मेरी चर्चमध्ये मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दीचा विचार करून वांद्रे वाहतूक विभागाने परिसरातील विविध प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध, वनवे आणि नो-पार्किंगचे नियम लागू केले आहेत.
यात्रेच्या काळात माउंट मेरी रोडवर सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत स्थानिक रहिवाशांची वाहने, पोलीस वाहने तसेच आपत्कालीन सेवांची वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश राहणार नाही.
केन रोडच्या वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. माउंट मेरी रोडपासून बी. जे. रोडपर्यंतचा केन रोडचा भाग स्थानिक पासधारक रहिवाशांची वाहने आणि आपत्कालीन वाहनांसाठी खुला ठेवण्यात येईल, तर इतर वाहनांसाठी या मार्गावर वनवे व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे बी. जे. रोडच्या दिशेने केन रोडवर प्रवेश करता येणार नाही.
परेरा रोडवरही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी वाहतूक वनवे करण्यात आली आहे. बी. जे. रोडकडून या मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे. याशिवाय सेंट जॉन बॅप्टिस्ट रोडवर स्थानिक रहिवाशांची वाहने आणि आपत्कालीन वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
अवजड वाहनांसाठी निर्बंध
माउंट मेरी यात्रेच्या कालावधीत दररोज सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत काही प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. के. सी. मार्ग, बॅपेल रोड, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, सेंट सेबॅस्टियन रोड, माउंट कार्मेल रोड, माउंट मेरी रोड, बी. जे. रोड आणि केन रोड या मार्गांचा त्यामध्ये समावेश आहे.
‘या’ मार्गांवर नो-पार्किंग
गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अनेक रस्त्यांवर पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. माउंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, हिल रोडवरील सेंट पॉल रोड ते मेहबूब सर्कल परिसर, माउंट कार्मेल रोड, बॅपेल रोड, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, सेंट सेबॅस्टियन रोड, रिबेलो रोड आणि डॉ. पीटर डायस रोड या ठिकाणी नो-पार्किंग व्यवस्था लागू असेल.
यात्रेसाठी वांद्रे परिसरात येणाऱ्या भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.