जागतिक ऊर्जा बाजारातील तणावाचा परिणाम; काही पंपांवर डिझेल खरेदीवर मर्यादा, मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा थेट फटका आता वाहनचालकांच्या खिशाला बसणार आहे. जागतिक ऊर्जा बाजारातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख खासगी इंधन विक्रेती कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये, तर डिझेलच्या दरात ३ रुपये वाढ केली असून, ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, देशभरात सुमारे ७,१०८ पेट्रोल पंपांचे संचालन करणाऱ्या नायरा एनर्जीने शनिवारी पहाटेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला. दरवाढीबाबत कंपनीच्या प्रवक्त्यांकडे प्रतिक्रिया मागण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून तातडीने कोणतेही उत्तर मिळाले नाही.
याआधीही नायराने वाढवले होते इंधनाचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर नायरा एनर्जीने यापूर्वीही इंधन महाग केले होते. २६ मार्च रोजी कंपनीने पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रति लिटरची वाढ केली होती.
यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनीही मे महिन्यापासून इंधनाच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली होती. मात्र, पुढील काळात नायरा एनर्जीने आपली दरवाढ मागे घेतली.
पश्चिम आशियातील तणाव काहीसा निवळल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्या. त्याचा परिणाम म्हणून १ जुलै रोजी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रति लिटर कपात केली होती. आता पुन्हा एकदा कंपनीने दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
डिझेलच्या विक्रीवर मर्यादा का?
दरम्यान, काही पेट्रोल पंपांवर डिझेलच्या खरेदीवर मर्यादा लागू करण्यात आल्यानेही चर्चा रंगली आहे. मात्र, पेट्रोलियम सचिव नीरज मित्तल यांनी सरकारकडून पेट्रोल किंवा डिझेलच्या विक्रीवर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रिटेल आणि घाऊक डिझेलच्या दरातील तफावत वाढल्याने मोठ्या प्रमाणावर डिझेल वापरणारे ग्राहक स्वस्त पर्यायासाठी पेट्रोल पंपांकडे वळत आहेत. कारखाने, दूरसंचार कंपन्या, हॉटेल्स आणि रुग्णालये यांसारख्या मोठ्या ग्राहकांकडून पेट्रोल पंपांवर डिझेलची मागणी वाढली आहे.
काही ठिकाणी हे ग्राहक एका वेळी ४०० ते ६०० लिटरपर्यंत डिझेल खरेदी करत असल्याने पेट्रोल पंपांवरील उपलब्ध साठ्यावर दबाव निर्माण होत आहे.
यामुळे जिओ-बीपीने काही पेट्रोल पंपांवर एका ग्राहकाला दररोज ५० लिटरपर्यंत डिझेल खरेदीची मर्यादा लागू केली आहे. दुसरीकडे, नायरा एनर्जीच्या काही पंपांवर ही मर्यादा ७० ते २०० लिटर इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
पेट्रोलचे आजचे दर
- मुंबई: ₹111.21 प्रति लिटर
- नाशिक: ₹112.44 प्रति लिटर
- पुणे: ₹111.90–112.02 प्रति लिटर
- दिल्ली: ₹102.12 प्रति लिटर
- चेन्नई: ₹107.76 प्रति लिटर
डिझेलचे आजचे दर
- मुंबई: ₹97.83 प्रति लिटर
- नाशिक: ₹99.05 प्रति लिटर
- पुणे: ₹98.68 प्रति लिटर
- दिल्ली: ₹95.20 प्रति लिटर
- चेन्नई: ₹99.55 प्रति लिटर