नवी दिल्ली (Petrol-Diesel Price Hike) : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारावर होत आहे. ब्रेंट कच्च्या तेलाचा दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, कच्च्या तेलाच्या दराने तीन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे भारतात (Petrol-Diesel Price Hike) पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे.
अमेरिका-इराण संघर्ष आणि सौदी अरेबियातील ऊर्जा सुविधांवरील हल्ल्यांमुळे तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. ब्रेंट क्रूडचा दर 97 ते 98 डॉलरच्या आसपास पोहोचला असून, 100 डॉलरचा महत्त्वाचा टप्पा पुन्हा गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम देशातील तेल कंपन्यांच्या खर्चावर होतो. मात्र, कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर तातडीने वाढतीलच असे नाही. तेल कंपन्यांचे मार्जिन, रुपया-डॉलर विनिमय दर, वाहतूक आणि विमा खर्च तसेच केंद्र व राज्य सरकारांचे कर यांचाही किरकोळ किमतीवर परिणाम होतो.
पश्चिम आशियातील तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे (Petrol-Diesel Price Hike) पेट्रोल-डिझेलच्या दरांवर त्याचा कितपत परिणाम होतो, याकडे भारतीय ग्राहकांचे लक्ष लागले आहे.