गोंदिया फ्लोअरबॉल चॅम्पियनशिप

गोंदियात ९ व्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल चॅम्पियनशिपचा दिमाखदार समारोप

Gondia Floorball Championship: गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलात  फ्लोअरबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ गोंदिया आणि फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन

गोंदियात ९ व्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल चॅम्पियनशिपचा दिमाखदार समारोप

Gondia Floorball Championship

 

कोल्हापूर, नागपूर, अहिल्यानगर व यवतमाळच्या खेळाडूंचे वर्चस्व

गोंदिया (Gondia Floorball Championship) : गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलात  फ्लोअरबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ गोंदिया आणि फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

तीन दिवस चाललेल्या अटीतटीच्या आणि रोमांचक सामन्यांनंतर ९ व्या अंडर-१२/१७ वयोगटातील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल चॅम्पियनशिप २०२६ चा दिमाखदार समारोप झाला. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो खेळाडूंनी सहभाग घेतला. तीन दिवस चाललेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य, शिस्त आणि खेळ भावनेचे दर्शन घडवले. अंतिम सामने अत्यंत चुरशीचे झाले. १२ वर्ष वयोगटातून मुलांच्या गटात कोल्हापूरच्या संघाने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले, तर १२ वर्ष  मुलींच्या गटात नागपूरच्या संघाने विजेतेपद पटकावले.

त्याचप्रमाणे १७ वर्ष वयोगटातून  अहिल्यानगरच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अजिंक्यपद मिळवले. तर  १७ वर्ष  मुलींच्या गटात यवतमाळच्या संघाने बाजी मारत विजेतेपदाचा चषक उंचावला. अशा प्रकारे स्पर्धेतील चारही प्रमुख गटांमध्ये १२ वर्ष वयोगटातील मुले (कोल्हापूर), मुली (नागपूर),  १७ वर्ष वयोगटातील मुले (अहिल्यानगर) आणि मुली (यवतमाळ) या संघांनी चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला. विजेत्या व उपविजेत्या संघांतील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल उपस्थित होते. याशिवाय (Gondia Floorball Championship) इंडियन फ्लोअरबॉल फेडरेशनचे सचिव रवींद्र चौथवे, नागपूरचे  दीपक वाडे, चॅम्पियनशिप डायरेक्टर जितेंद्र सातपुते, यवतमाळचे  भेंडे, वर्ध्याचे डॉ.प्रकाश चोपडे, गोंदियाचे जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मी शंकर यादव, रोहित अग्रवाल आणि गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.