रामाला सोन्याचे सिंहासन कधीच नको होते; त्यांना शुद्ध आचरण हवे होते; पण जर रामाच्या नावावर उभारलेल्या व्यवस्थेलाच पैशाचा मोह जडत असेल, तर दोष मंदिराचा नसतो, दोष त्या मानसिकतेचा असतो, जिने रामाला श्रद्धेचे प्रतीक न मानता सत्ता आणि संपत्तीचे साधन बनवले हीच खरी शोकांतिका आहे. रामाच्या नावाने देणग्या वाढत आहेत; पण मर्यादा, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व कमी होत आहे. जिथे श्रद्धेच्या दानपेटीवरही संशयाची सावली पडते, तिथे दगडांचे मंदिर कितीही भव्य असले, तरी मूल्यांचे मंदिर कोसळू लागते.
भारतात आज सर्वाधिक उच्चारले जाणारे नाव कोणते असेल, तर ते रामाचे. आणि सर्वाधिक विसरले गेलेले मूल्य कोणते असेल, तर ती रामाची मर्यादा.
ज्या रामाला मर्यादा पुरुषोत्तम राम म्हटले जायचे, ज्याचे प्रात:समई स्मरण केले जायचे, म्हणून रामप्रहर म्हटले जायचे; मात्र आज दंभयुक्त आवाजात “जय श्रीराम” म्हटले जाते.
हीच आजच्या काळाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.देशात रामाचे मंदिर उभे राहिले. लाखो दिवे पेटले. कोट्यवधी रुपयांचे सोहळे झाले. घोषणांनी आकाश दणाणले. रामाऐवजी “जय श्रीराम”चा निनाद देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला; पण त्याच काळात शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक झालेला आहे. तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत भटकत आहेत. शिक्षण महाग झाले आहे. आरोग्यसेवा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सामाजिक तणाव वाढला आहे. निवडणुका, न्यायालयावरील लोकांचा विश्वास उडाला, द्वेषाचे राजकारण अधिक धारदार झाले आहे. मग या सर्वांवर प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेला नाही का? राम म्हणजे केवळ मंदिराचा कळस आहे का? की राम म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे नैतिक धैर्य आहे? मात्र, आज रामाचा हा विचार मागे पडला आणि रामाचे ब्रँडिंग पुढे आले. राजकारणाला राम नको होते; रामाचे नाव हवे होते.
कारण नावाने गर्दी जमते. गर्दीने घोषणा होतात. घोषणांनी भावना पेटतात. आणि पेटलेल्या भावनांच्या लाटेवर सत्तेपर्यंत पोहोचणे सोपे होते. आज राजकारणाने धर्माचा स्वीकार केलेला नाही, तर राजकारणाने धर्माचा वापर सुरू केला आहे. ही दोन वाक्ये दिसायला सारखी वाटली, तरी त्यांच्यात संपूर्ण युगाचा फरक दडलेला आहे. धर्म जेव्हा राजकारणाला दिशा देतो, तेव्हा रामराज्य जन्माला येते; पण राजकारण जेव्हा धर्माला दिशा देऊ लागते, तेव्हा लोकशाही धोक्यात येते. आज प्रत्येक निवडणुकीत मर्यादा पुरुषोत्तम राम नाही, तर अहंकारी “जय श्रीराम” आहे. प्रत्येक भाषणात जय श्रीराम आहे. प्रत्येक पोस्टरवर जय श्रीराम आहे. प्रत्येक प्रचारसभेत जय श्रीराम आहे.
फक्त...
गरिबाच्या झोपडीत राम दिसत नाही.
शेतकऱ्याच्या अश्रूंमध्ये राम दिसत नाही.
बेरोजगाराच्या वेदनेत राम दिसत नाही.
महात्मा गांधी “हे राम” म्हणत प्राण सोडून गेले; पण त्यांनी कधीही रामाचा वापर विरोधकांचा द्वेष करण्यासाठी केला नाही. दलितांवर, आदिवासींवर, अल्पसंख्याकांवर अन्याय झाला, की रामाचे नाव अचानक शांत का होते? हा प्रश्न विचारणे धर्मद्रोह नाही, तोच खरा धर्म आहे!! महात्मा गांधींच्या रामराज्याची कल्पना कोणत्याही एका धर्माच्या वर्चस्वाची नव्हती; ती न्याय, समता आणि नैतिक शासनाची होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना कोणत्याही एका धर्माला राज्यावर बसवले नाही; त्यांनी कायद्याला सर्वोच्च स्थान दिले. संत तुकारामांनी ढोंगीपणावर प्रहार केला. संत कबिरांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला. महात्मा फुल्यांनी धार्मिक शोषणावर प्रहार केला. कारण भारताची संतपरंपरा ही प्रश्न विचारणारी परंपरा आहे; प्रश्न दडपणारी नाही. आज मात्र प्रश्न विचारणाऱ्यांना “देशद्रोही”, “धर्मद्रोही”, “अर्बन नक्षल”, “टुकडे-टुकडे गँग” अशा शिक्क्यांनी गप्प करण्याची फॅशन झाली आहे.
इतिहास सांगतो—
ज्या समाजात प्रश्न मरतात, त्या समाजात हुकूमशाही जन्माला येते. ज्या समाजात व्यक्तिपूजा वाढते, त्या समाजात संविधान कमकुवत होते. आणि ज्या समाजात देवाचे नाव सत्तेच्या बाजारात विकले जाते, त्या समाजात धर्म नव्हे; धार्मिक उद्योग वाढतो. रामाने कधीही स्वतःची पूजा मागितली नव्हती. त्यांनी आचरणाची अपेक्षा केली होती.
रामाने कधीही द्वेष शिकवला नव्हता. त्यांनी संयम शिकवला होता. रामाने कधीही प्रचार मागितला नव्हता. त्यांनी सत्याची साथ मागितली होती. आणि या सगळ्यात सर्वात मोठी विडंबना म्हणजे—अलीकडेच अयोध्येतील राममंदिराशी संबंधित देणग्या आणि आर्थिक व्यवहारांबाबत निर्माण झालेल्या वादांनी अनेकांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. श्रद्धेच्या सर्वोच्च प्रतीकाभोवतीच आर्थिक गैरव्यवहारांच्या बातम्या समोर येत असतील, तर तो केवळ एका संस्थेचा प्रश्न राहत नाही; तो समाजाच्या नैतिक अधःपतनाचा आरसा ठरतो.
रामाला सोन्याचे सिंहासन कधीच नको होते; त्यांना शुद्ध आचरण हवे होते; पण जर रामाच्या नावावर उभारलेल्या व्यवस्थेलाच पैशाचा मोह जडत असेल, तर दोष मंदिराचा नसतो, दोष त्या मानसिकतेचा असतो, जिने रामाला श्रद्धेचे प्रतीक न मानता सत्ता आणि संपत्तीचे साधन बनवले हीच खरी शोकांतिका आहे.
रामाच्या नावाने देणग्या वाढत आहेत; पण मर्यादा, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व कमी होत आहे. जिथे श्रद्धेच्या दानपेटीवरही संशयाची सावली पडते, तिथे दगडांचे मंदिर कितीही भव्य असले, तरी मूल्यांचे मंदिर कोसळू लागते.
आज आपण मंदिरे उभारत आहोत...
पण माणूस पाडत आहोत.
घंटा वाजवत आहोत...
पण विवेक गप्प करत आहोत.
ध्वज उभारत आहोत...
पण संविधानाची प्रतिष्ठा कमी करत आहोत.
जर धर्मामुळे माणूस मोठा होत नसेल...
तर तो धर्म नसून केवळ प्रदर्शन आहे.
जर रामाच्या नावाने समाज विभागला जात असेल...
तर तो जयघोष नसून मर्यादेचा पराभव आहे.
आज भारताला रामाच्या नावाची नव्हे...
रामाच्या स्वभावाची गरज आहे.
कारण मंदिर बांधण्यासाठी सिमेंट लागते.
पण रामराज्य घडवण्यासाठी सत्य, न्याय, नीतिमत्ता, करुणा, विवेक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मर्यादा लागते. आणि म्हणूनच... आज भारतातील सर्वात मोठा प्रश्न अयोध्येतील मंदिराचा नाही. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की..... राम अयोध्येत आले... पण भारताच्या राजकारणात, समाजात आणि आपल्या अंतःकरणात ते खरोखर आले का? या प्रश्नाचे उत्तर जर “होय” असेल... तर भारताला घोषणांची गरज नाही. आणि उत्तर “नाही” असेल... तर लक्षात ठेवा— वनवास रामांचा संपलेला नाही...
वनवास अजूनही मर्यादेचाच सुरू आहे. “इतिहासात रामाला चौदा वर्षांचा वनवास मिळाला होता; मात्र आज त्यांच्या मर्यादेला अजून किती वर्षांचा वनवास मिळणार आहे, हा प्रश्न भारतीयांनी स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.” आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की सरकारवर टीका केली, की धर्मावर टीका केल्याचा आरोप होतो. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला, की रामाचा अपमान केल्याचे सांगितले जाते. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.
प्रकाश कमलाताई गोपाळराव पोहरे
मो. नं. : +९१-९८२२५९३९२१
प्रतिक्रिया देण्यासाठी थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा
आपल्या प्रतिक्रिया 2prakashpohare@gmail.com या इ-मेल
किंवा ९८२२५९३९२१ या व्हॉट्सअप वर पाठवा.
प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.