उरे जय श्रीरामजी हो ग्यारंटीबाज, ‘अच्छेदिन’- ‘मन की बात’ फेम मिठ्ठूछाप गोळबोले जानबाज दमकोंडीकर ‘नत्थुआबा’ उर्फ ‘मी नाई त्यातली कळी लावा आतली’ या वगनाट्याचे लेखक, दिग्दर्शक उर्फ कास्तकाराईचे ‘जानी दुश्मन’ उर्फ ‘दे दान तं सुटे गिऱ्यानं’ असा निवळनुक आयोगाचा ‘बजार’ भरोनारे, गोळ गयानं मेरे भाई और बयनो ‘सबके अच्छे दिन आयेंगे’ अशा ‘ ग्यारंटीचं’ प्रवचन करनारे महासत्तेचे ‘सपन’ रंगोनारे जादुगर नत्थुआबा!
अबे ओय बुळातल्या काया मातीत हेलपाटे घेनाऱ्या, स्वाभिमानानं जगनाऱ्या अन बारोमास बेरीज-वजाबाकीत ‘फेल’ व्हनाऱ्या अळानी बाबुरावजी उर्फ बाब्या! बारोमास राबराब राबनाऱ्या भल्या मान्सा तु काहून बयादाटून मायावानी चतऱ्या ‘लीडराईची’ कायजी करुन रायला? मले येवळा लंबासटांग रामराम फक्त तूच करु शकतं, सदाई पोटातल्या भुकीची कायजी करतं म्हनून मले तं तु त्या डीपीवरच्या चारसेईस व्होल्टेजच्या चिन्हावानी दिसून रायला तरी चभर-चभर कऱ्याचा धंदा सोळलाच नाई काय!
तुयापरस तं बावा आमी ‘भुमिहिन’ मान्सं खाऊन-पीवून मजा मारुन रायलो? अन तु वजेवजे मातीत जावून रायला! तरी बरं झालं तुई उभी जीनगानी शेंड्यावरच्या ‘दिवानजीजोळ’ गहान ठुली हाये! म्हनून तं आमी चतऱ्या बुद्धीनं तुले ‘अळानी’ समजून ईलेक्शनात ‘चाराने खर्च करून बारान्याची’ कमाई करतो?
उरे काया मातीतल्या महादेवा, तू डंगरा बैल झाला तरी गाईच्या मांग पयनाऱ्या जवान गोऱ्यावानी वयवय करून रायला ना! गळ्या सत्तेच्या ‘खुर्चीची ताकद अन आवक’ आजलोग बुळातल्या कष्टकरी मान्साईले ओयखताच आली नाई? पयले या धंद्याले ‘देशसेवा’ समजत; पन आता तं ईच्यामायले राजकारन म्हंजे चाराने खर्च करा अन गपकन बाराने आवकची कमाई करत बसा! येवळा बगर शेतीचा सातपीळ्याईची कमाई देनारा, दुभत्या म्हशीवानी नगदी ‘धंदा’ झाला!
म्हनून मोठमोठाले पक्ष फोळून चाळीस-पन्नास आमदाराच्या जोळाची ताकद दाखोवून ‘येकच लक्ष-आयागया हमारा पक्ष’ या खतावर उगयनाऱ्या छत्रीवानी पक्ष निंगून रायले! येकेका पक्षाचे चार-चार तुकळे झाले! कोन्ताबी पक्ष कास्तकाराले, गरीबाले लुटून सोताची अळमाप संपत्ती कमावून रायला? ‘कामापुरता मामा’ असा कास्तकाराईचा मतदानापुरता फायदा घीवून पाच साल त्याले बेभावाच्या नदीत बुचकया देत बसतात!
गळेहो, सारेच बीनबुळाचे ‘लिडर’ तुमच्याच भरोशावर ‘कमाई’ करून खुर्चीले गोचिळावानी चिपकतात! येवळं रामायन घळते, तरी मतदान करता खेपी बुळातली कष्टकरी जनता पाचशे रुपयाच्या दक्षिनेनं ‘घालीन लोटांगन वंदिन चरन, ईव्हीयेमचे दाबीन बटन’ अशी करते ना!
तुमी ग्यारंटीबाज छाती ठोकून मताईची भीक मांगतली, तरी या ईज्ञानयुगातल्या लोकाईले चांगल्या मान्साच्या नावापुळचं बटन दाब्याची आदत पळली नाई? ते फक्त पाचशे रुपयात ‘हाऊसफुल्ल’ करनाऱ्या भौनं कीती नंबरची बटन सांगतली त्यालेच कायजात फीट्ट करून बटन दाबतात!
निवळनुक आयोगमामा फक्त तुमी सांगसाल ते ‘वगनाट्य’ लिवून सादर करनारा दिग्दर्शक असते! पनं त्या वगनाट्यातले ‘कलाकार’ लोकशाईले लुटनारे हवसे-गवसे- नवसे पयस्याची ‘कला’ दाखोयात पट्टीचे कलाकार असतात! फक्त ईलेक्शन आलं का पायलीचे पन्नास पक्ष उगयतात अन बाराने कमाई झाली का आपोआप वावटयीवानी उळून जातात!
गळेहो, या सोंगाळ्या राजकारनाच्या धंद्यात पयसा ओतनारा ‘काये धंदेबाज’ मानुस शंभरच्या नोटीचे येक कोटी रुपये करु शकते! ग्यारंटी, अच्छेदिनाच्या घोषनाईच्या वारवायदनानं, बुळातला कास्तकार, गोरगरीब मान्सावर अन अतिश्रीमंत पक्षातल्या बेसरमच्या झाळावानी फुटेल राजोट्याईवर ईळीमिळी गुपचीळीचा ‘फासा’ फेकून तेईच्यावर जबरदस्ती करातच आपला मोठेपना समजतात! मंग राजोटेईची, दोस्ताईची, बेपाऱ्याईची ‘वर्ज्रमुठ’ बांधून मातीत घामरगत आटोनाऱ्याईले काहून बेभावाच्या दोरीनं वावरातल्या झाळाले गयफास घ्याले लावतात? म्हंजे छाकटे राजकारनी लिडर ईलेक्शनात खर्च चाराने करतात अन खुर्चीले चिपकल्यावर कसे काय बारान्याच्या ‘आवकची कमाई’ करतात? म्हंजे राजकारनातल्या राजोटेईची आवकच्या कमाईची गोठ ‘सोळाने’ खरी नाई काय?
अरुण मोडक
९८२२५९३९४७