गुदगुल्या

सरकारी घोषना झाल्या ‘हायफाय’!शेतकऱ्याच्या नसीबी आला ‘दुस्काय’...!

उरे जय जवान जय कीसानहो जानुआबा, आज तुमी टीवीपुळे असे टोंगयात मुंडकं खूपसून कोन्ता ‘सखोल’ ईचार करुन रायले! आज ‘आमची मान्सं-आमची माती’, ‘आमची राजनीती करते शेतकऱ्याची फजीती’ हा कार्यक्रम पायला वाट्टे!

सरकारी घोषना झाल्या ‘हायफाय’!शेतकऱ्याच्या नसीबी आला ‘दुस्काय’...!


मेरे देश की धरती...ऽऽ, उगले सोना उगले हिरेमोती...ऽऽ! बैलोके गलेमे जब घुंगरु जीवन का गीत सुनाते है! हमको सबुर हो जाता है तो खुशीओंके ‘कमल’ मुस्काते है...ऽऽ!
बंद कर बे पोट्ट्या ते टीवीचं टप्पर अन् ते शेतकऱ्याच्या ‘चेंढायन्या’ खोर गानं! मेरे देश की धरती उगले सोना हिरे मोती म्हंतात ससरीचे! साऱ्या गोठी बराबर पायजात ना! आतालोग जगाले पोचनारी कायी माती आपली मायमाऊली व्हये ना! पन सारा तुमचा-माया खेय त्या निसर्गाच्या हातात हाये ना! ईकळे घोटभर पान्यासाठी मान्सं-धरती दोघंबी तळफळून रायले मंग सोनं हिरेमोती कसे काय उगयतील? कोन्त्याबी गान्यानं नीरा ससरीचे मान्साले हरभऱ्याच्या ‘झाळावर’ अन् खोटे आश्वासनानं सरकार गपकन ‘तोंडघशी’ पाळते!
उरे जय जवान जय कीसानहो जानुआबा, आज तुमी टीवीपुळे असे टोंगयात मुंडकं खूपसून कोन्ता ‘सखोल’ ईचार करुन रायले! आज ‘आमची मान्सं-आमची माती’, ‘आमची राजनीती करते शेतकऱ्याची फजीती’ हा कार्यक्रम पायला वाट्टे! पन त्या लायन्या नातूवर काहाले बयादाटून खेकसून रायले?
अबे मानुस दुस्कायात अशीच ‘चीळचीळ’ करते ना बे बाबुराव! त्यात ईच्यामायले हे टीवीतले हवामानाचा अंदाज सांगनारे हेंबाळे हरेक रोजी ‘येलो- रेड’ अलर्ट सांगू सांगू आशेवर मान्सालेच गाभन ठुन रायले!
बेज्याच वायसी गोठ झाली ईच्यामायले मान्साची! येवळं अभायात कायेकुट्टं ढग येतात-अरमान्नं गरजतात पन कुठी बरसतात हेच समजनं कठीन झालं! जसं काई सरकारवानी ‘जिकळे वयलं तिकळे पळलं’ अशीच गोठ झाली! कोनावरच भरोसा ठुता येत नाई या चलवाद्या जमान्यात! ना टीवीवर ना मायबाप सरकारवर! तसबी या ईज्ञानयुगातल्या यंत्रतंत्रानं ‘भारता’चा बाप व्हयेल ‘ईंडिया’ कीती पुळे गेला! जुन्या जमान्यात पोस्टातल्या पत्राले कीती टाईम लागे! मरेल मान्साची तेरवी व्हून जाये ता कुठी मातीवर याचं पत्र भेटे! आता सारं जग आॅनलाईन झाल्यावर येका सेकंदात ‘आॅन द स्पाॅट रिपोर्ट’ अन् त्या घटनेचे बावलंग पायाले भेट्टे! आता तं हरेकाच्या घरात या आधुनिक पीळीतल्या लेकराईले म्हताऱ्या मान्सानं बोलाचाबी अधिकार रायला नाई! पन गळ्या बाबुराव मान्साचं कायीज थटथट तुटल्यावर म्हताऱ्या मान्साले तोंड आवरल्या जात नाई हेच खरं ‘दुखनं’ हाये!
आपून कीतीकई तेईच्यावर खेकसलं तरी हेंबाळे ईत्रायेल पोट्टे टीवी-मोबाईलातले बावलंग पायल्याबगर बह्याळाईले गमतच नाई! त्या बह्याळबेलन्याईले पोटातल्या ‘भुकी’परस जीवाच्या ‘मनोरंजना’ची कायजी असते! मले सांग त्या टीवीतलं ते चेंढायन्याखोर गानं आयकलं का मान्साची तयपायातली आग मस्तकात जातेच ना! मेरे देश की धरती...! अबे त्या काया मातीले वदरच्या पोटभर पान्याची साथ असली ताच हिरेमोत्यावानी ‘अन्न’ तयार करील ना! पन सायाचं हे हेंबाळं सरकार ईतक डेंजरझोन व्हयेल हाये का कर्जमाफीच्या टप्प्याटप्प्यानं हरेक शेतकऱ्याले ‘टपकोयाची’च भाषा बोलते! तसंच आता या दुस्कायाचं चित्र मले बेज्याच खराब दिसून रायलं!
आता पा बरं येवळी भयान दुस्कायाची सावली महाराष्टावर पसरल्यावर हे बीना अकलीचे कांदे व्हयेल सरकारातल्या मंत्री-संत्र्याईले दुस्कायाच्या मिटींगीत काजु-बदाम-पीस्त्याचा ‘चखना’ पायजे? म्हंजे कीती जुन्या जमान्यातल्या लोकसेवकात अन् आताच्या सोंगाळ्या लोकसेवकात फरक पळला? जुन्या जमान्यातले राजोटे घरच्या शिदोरीवर ताव मारुन लोकशाईचा प्रचार करत व्हते अन् आताचे बाजींदे राजोटे ‘आव’ आनून काजू-बदाम-पीस्त्यावर ‘ताव’ मारतात अन् दुस्कायावर चर्चा करतात?
तसबी या ‘सत्यमेव जयते’च्या चिखलात उगयेल हे भादरं ‘कमळ’ ईतल्यात बेज्याच ‘थयथय’ नाचून लोकशाईच्या शेंड्यावर बसून ‘शिरजोर’ व्हून रायलं! शेंड्यावरच्या नत्थु आबापासून तं मुंबईच्या राजोट्यालोग सबनाईचं काम ‘हायफाय’ झालं! सारे ईचिबईन शेतकऱ्याचेच लेकर असल्यावरबी तेईले काया मातीतल्या ‘बापाच्या’ कष्टाचं अन् हेलपाट्याचं काईच घेनं-देनं नाई! येकखेप बुळाखाली खुर्ची भेटली का आयुष्यभराचं पांग फीटते! योजना ‘अफाट’ अन् संध्याकाय झाली का खर्चाच्या आवकची ‘भरभराट’! ‘जनता जायेना चुल्यात, हे गुततात मलाई ओरप्यात’! गप्पेल राजोटे भाजतात ताथी भाकर मलाईच्या भट्टीत?
बापहो, ज्याले ‘खांडुक’ व्हते त्यालेच त्यातली ‘ठनक’ मालुम असते! वदरुन मलमपट्टी करनाराले काय ‘थत्त्तुरा’ समजते? तशीच गोठ औंदाच्या दुस्कायात शेतकऱ्याची व्हनार हाये! पयलेच गेल्या सालभरापासून जाईर व्हयेल अन् चिंदीचा सरप करेल ‘कर्जमाफी’ या हेंबाळ्या सरकारच्या टप्प्याटप्प्याच्या ‘तितंब्यानं’ शेतकऱ्याले अदमोसे  केलं अन् आता दुस्कायाचं अभायायेवळं मोठ्ठं संकट जीवावर उठलं तरी हे सोंगाळे राजोटे बांधावर गेल्यापरस सळकीवरुनच ‘सीतावून भाताची परीक्षा घ्यातच टाईम वाया गमावतील अन् शेतकरी तळफळून मेल्यावरच सरकारी मदतीची ‘अटीशर्थी’ टाकून खोटी घोषना करतील? कोन्तचं काम धळं नाई त्याच्यानं हमेशा अशी निसर्ग आपत्ती कष्टकरी जनतेवर येनारच हाये!
ना कुठी कायजीनं वृक्षारोपन, फक्त फटु काळून पेपरात छापाचा तमाशा करतात! ना पानी अळवा-जीरवा ना झाळं लावा, कोन्तीच योजना बुळालोग पोचत नाई! फक्त ‘आवबे लड्डू जावबे लड्डू, हमारा खीच लेते मड्डू’! गल्लीपासून तं दिल्लीलोगचे राजोटे फक्त सरकारी आपकमाईची ‘मलाई’ खायातच गुंग हायेत! त्या हवामान खात्याच्या पिलमपोयेपासून तं बॅंकाईच्या सायेबालोग, पिकईम्याच्या कंपनीपासून तं झेळपीच्या मीनी मंत्रालयातले सारे भोपंजी ईच्यामायले बुळाखालची खुर्ची संभायता पयशाची मलाई खावून ‘हायफाय’ जीनगानी जगून रायले! अन् दुस्कायातल्या गरम-गरम चटक्यानं मातीत कष्ट करनारा जगाच्या ‘पोशिंद्या’वर मातर या अंदर-भाईरच्या तितंब्यानं गयफास घ्याची पायी आली?
बापहो, या कृषीप्रधान ईंडियातल्या साऱ्याच जनतेच्या पोटातली तहानभुक अन् अर्थयेवस्था वदरच्या पान्यावर, शेतकऱ्यावर उभी असलीतरी हे हेंबाळे राजोटे काजू-बदाम-पीस्त्याच्या ‘अलपा’वर जीते रायतील काय? का काया मातीत हेलपाटे घेनाऱ्या बापाच्या ‘कष्टावर’ जगतील? या काया मातीले ‘पोटभर’ पानी भेटलं तं ते ‘मनभर’ पीक देतेच! पन तीले पानी भेटलं नाई तं आपून कोन्ते कंद उपटून खासाल? 
वावरातल्या धुऱ्यावर जावून खांद्यावर शेतकऱ्याच्या डोयातले आसू पुसल्यानं काईच व्हनार नाई! फक्त कायजातून त्याले अधार द्याची जबाबदारी सरकारवरच असते! तो भीक मांगत नाई पन हक्काचं मांगनारा येकमेव काया मातीतला स्वाभिमानी योद्धा हाये! फक्त अटी-शर्थीपरस, ‘हायफाय’ घोषना केल्यापरस ‘सरसगट’ शब्द तुमी कायजात पक्का करा!!
डोयापुळे बापाच्या दाटला अंधार
च्युवत्या बनोयाचा करु नोका गजर!
कष्टकरी शेतकऱ्याले द्या रे अधार
काया मातीतला तोच खरा जादुगर!
दुस्कायात जगला जरी शेतकरी
ताच भेट्टे जगाले पोटभर भाकरी?

अरुण मोडक
९८२२५९३९४७