कटाक्ष

सत्तेच्या सिंहासनावर पुत्रच का? स्त्री प्रश्नावर मौन!

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी  १८४८ साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना दगडफेक, शेणफेक आणि शिवीगाळ सहन करावी लागली, कारण हिंदू समाजाला स्त्री शिकलेली नकोच होती.

सत्तेच्या सिंहासनावर पुत्रच का? स्त्री प्रश्नावर मौन!

भारतीय समाजातील स्त्रीचे स्थान हा शतकानुशतके चर्चेचा आणि संघर्षाचा विषय राहिला आहे. ‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्री पटवर्धन यांनी मांडलेला वादही याच व्यापक प्रश्नाचा एक भाग आहे. हिंदू समाजरचनेत स्त्रीला समान स्थान न मिळाल्याची आणि परंपरेच्या नावाखाली तिचे दुय्यमत्व कायम राखले गेल्याची टीका केली जाते. हा प्रश्न केवळ धार्मिक नसून सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अंगानेही गंभीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे जाहीर दहन करून स्त्री आणि दलितांवरील शास्त्राधारित अन्यायाला आव्हान दिले. स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि समान अधिकार मिळावेत, यासाठी त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातूनही प्रयत्न केले.

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान हा शतकानुशतके चर्चेचा आणि संघर्षाचा विषय राहिला आहे. ‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्री पटवर्धन यांनी मांडलेला वाद हा याच व्यापक प्रश्नाचा एक भाग आहे . हिंदू समाजरचनेत स्त्रीला खरोखर समान स्थान कधीच दिले गेले नाही, आणि परंपरेच्या नावाखाली तिचे दुय्यमत्व आजही कायम राखले जाते. हा प्रश्न केवळ धार्मिक नसून सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अंगानेही तितकाच गंभीर आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  मनुस्मृतीचे जाहीर दहन करून स्त्री आणि दलितांवरील शास्त्राधारित अन्यायाला आव्हान दिले. आंबेडकरांच्या मते, हिंदू धर्मशास्त्रांनी स्त्रीला कधीही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून मान्यता दिली नाही. ती नेहमी पिता, पती किंवा पुत्र यांच्या छत्राखालीच राहिली पाहिजे, अशी शिकवण मनुस्मृतीत आढळते.
“पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने। रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ॥”
मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायातील हा तिसरा श्लोक  “स्त्री कधीही स्वातंत्र्याला पात्र नाही”  हेच सांगतो. या श्लोकाचे समर्थक कितीही सारवासारव करोत, अर्थ बदलण्याचा प्रयत्न करोत, पण वास्तव हे आहे की ही मानसिकता आजही समाजाच्या रक्तात मुरलेली आहे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना वारसाहक्क, घटस्फोटाचा अधिकार आणि संपत्तीत समान वाटा मिळवून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याच परंपरावादी शक्तींनी त्याला कडाडून विरोध केला होता  हे विसरून चालणार नाही.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी  १८४८ साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना दगडफेक, शेणफेक आणि शिवीगाळ सहन करावी लागली, कारण हिंदू समाजाला स्त्री शिकलेली नकोच होती. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा-विवाहासाठी आयुष्य वेचले, कारण त्याकाळी विधवा स्त्रीचे केशवपन करून, पांढरी साडी नेसवून तिला जिवंतपणीच सामाजिक मृत्यू दिला जात असे. गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारणेला धर्मापेक्षा प्राधान्य दिले पाहिजे अशी भूमिका घेतली, आणि त्यासाठी त्यांना टिळकांसह अनेक परंपरावाद्यांशी संघर्ष करावा लागला. राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध लढा दिला, पण ही प्रथा बंद करण्यासाठी शेवटी १८२९ साली परकीय ब्रिटिश कायद्याचाच आधार घ्यावा लागला. हिंदू समाज स्वतःहून सुधारण्यास तयार नव्हता, हेच यातून सिद्ध होते. आजही विधवेने समोर येऊ नये, सुतक पाळावे, असे मानणारे उच्चभ्रू लोक आपल्या आसपास सहज सापडतात. शतकानुशतके उलटूनही मानसिकता तीच आहे.
हिंदू घरांत मुलगा देवाच्या निर्जीव मूर्तीची पूजा-आरती करतो, वंशाचा दिवा मानला जातो, अंत्यसंस्काराचा अधिकारी ठरतो, पिंडदान करतो, पण त्याच घरातील जिवंत, श्वास घेणारी मुलगी मात्र ओझे मानली जाते, हुंड्याचा प्रश्न बनते, लग्नानंतर “परक्याचे धन” ठरवली जाते. निर्जीव मूर्तीला जो मान दिला जातो, तो सजीव कन्येला नाकारला जातो. यापेक्षा मोठा विरोधाभास कोणता असू शकतो? “मुलगी म्हणजे परक्याचे धन” ही म्हण आजही घराघरांत रुजलेली आहे, जी जन्मापासूनच मुलीला “आपली नाही” असे ठसवते.
फिल्म इंडस्ट्रीचे उदाहरण हे या दांभिकतेचा आरसा आहे. कपूर, बच्चन, धर्मेंद्र यांसारखी घराणी पिढ्यान् पिढ्या इंडस्ट्रीत आपल्या पुत्रांना, सुनांना मानाने स्थान देतात, पण स्वतःच्या मुलींना त्याच क्षेत्रात पाठवण्यास कचरतात. मात्र, दुसऱ्यांच्या मुली सुनेच्या रूपात स्वीकारायला तयार असतात. “मुलाच्या करिअर, स्वातंत्र्य, निवडीवर जो विश्वास दाखवला जातो, तोच विश्वास मुलीच्या बाबतीत कधीच दिसत नाही.”
इंग्लंड, नेदरलँड्ससारख्या देशांत राणी स्वतः राज्यकारभार करू शकते. एलिझाबेथ दुसरी हिचे उदाहरण जगासमोर आहे, पण भारतीय संस्थानांमध्ये वोडेयार (म्हैसूर) किंवा भोसले (कोल्हापूर-सातारा) घराण्यांसारख्या राजघराण्यांत वारस नसल्यास मुलीला गादीवर बसवण्याऐवजी दत्तक पुत्र घेतला जातो. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे उदाहरण हेच अधोरेखित करते  दत्तक पुत्र इंग्रजांना मान्य नव्हता, कारण गादीचा वारस “रक्ताचा पुरुष” असावा, स्त्री स्वतः सत्ताधीश असूच शकत नाही, ही मानसिकता तेव्हाही होती. सत्ता, वारसा आणि अधिकार हे केवळ पुरुषांचेच क्षेत्र मानले जाणे, हे पुरुषप्रधान व्यवस्थेचे स्पष्ट लक्षण आहे . आणि हे चुकीचे आहे.
राजकीय व्यासपीठावरूनही तोच प्रतिगामी सूर
संघ परिवार आणि भाजपची भूमिकाही या पुरुषप्रधान मानसिकतेला पोषकच ठरते. त्यांच्या संघटनात्मक चौकटीत स्त्री केवळ “चूल आणि मूल” यापुरतीच मर्यादित राहते. स्वतः गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मुलींनी IAS अधिकारी  होण्याआधी आधी एक “कुशल आई” बनण्याचा प्रयत्न करावा, असा प्रतिगामी सल्ला दिला होता. हे स्पष्ट दाखवते की उच्च पदावर असलेल्या स्त्रियासुद्धा याच पुरुषप्रधान चौकटीत अडकलेल्या आहेत आणि तीच विचारसरणी पुढे नेतात. स्त्रीचे स्थान चूल-मुलापुरतेच मर्यादित ठेवणारी ही मानसिकता आधुनिक भारताला मागे खेचणारी आहे.
संकटकाळात समाजाने संरक्षणाचे ओझे नेहमी स्त्रीच्या शरीरावर आणि स्वातंत्र्यावरच लादले. पुरुषांवर नाही. आज अनेक मुली फिल्म इंडस्ट्रीत, राजकारणात, प्रशासनात यशस्वी होत असल्या तरी हे यश समाजाने “दिलेले” नाही. 
भाग्यश्री पटवर्धन यांनी उपस्थित केलेला प्रश्न  निर्जीव मूर्तीची पूजा आणि सजीव कन्येची उपेक्षा  हा हिंदू समाजाच्या दांभिकतेवर थेट बोट ठेवणारा आहे. आंबेडकर, फुले, कर्वे, आगरकर, रॉय यांनी दाखवलेला मार्ग आजही पूर्णत्वास गेलेला नाही; उलट राजकीय व्यासपीठांवरूनही तीच पुरुषप्रधान मानसिकता वेगळ्या शब्दांत पुन्हा पुन्हा मांडली जाते. निर्जीव मूर्तीला आरती आणि सजीव मुलीला उपेक्षा हा विरोधाभास संपवणे, हीच खऱ्या अर्थाने या सुधारकांना दिलेली आदरांजली ठरेल. समाजाने आता स्पष्टपणे मान्य केले पाहिजे  ही व्यवस्था चुकीची आहे, आणि ती बदलायलाच हवी! तूर्तास इतकेच!

जयंत माईणकर
ज्येष्ठ पत्रकार
मो. ९८२१९१७१६३