उरे काहो देवबाप्पा, तुमी काहून आसनावर विराजमान झाल्या झाल्या डोयावर हात, कानावर हात अन् सोंडीवून हात फिरोत कोन्त्या ईचारात गुंग झाले? तुमच्या तब्येतीची कायजी घ्याले, तुमचं भूतलावरच्या भक्ताईच्या धांगळधिंगान्यापासून सोरक्षन कराले मले त्या महादेव-गिरीजा मायनं तुमच्यासंग धाळलंं ना! आपून लयमोठ्या उल्हासानं आलो खरी पन औंदा अथी अलगच माहोल दिसून रायला! वदरचं पानी आलं नाई त्याच्यानं शेतकरी ‘घायल’ झाले, मोठाल्या शयरातले भक्त फक्त भदाळ्या अवाजाच्या डीजे-डाॅल्बी-अन् लेझर लायटिंगच्या नांदात खुश हायेत! पन तुमी कोन्त्या भारी ईचारात पळून ‘बेचैन’ झाले बाप्पा? करु काय सोर्गातल्या महादेव-गिरीजा मायबापाले हिडीओ काॅल! दाखू काय ‘आॅन द स्पाॅट’ रिपोर्ट?
उरे फेका ना त्या फोनागिनाच्या उरफाट्या धंद्याले उंदिरमामा! येक तं या भुतलावर आल्यापासून या डिजेच्या अवाजान माये कानफट बसले अन् त्या लायटिंगच्या उजीळानं डोये फुटके व्हाची पायी आली! म्हंजे मायी गत त्या तीन तोंड्या चिन्हावानी झाली! कान असल्यावरबी आयकु येत नाई! डोये असूनबी दिसत नाई अन् तोंड असूनबी बोलता येत नाई! ईतकं खतरनाक स्वरुप या गनेशोत्सवाले भक्ताईनं आनलं!
माया महादेव-गिरीजामायले, वदरच्या साऱ्याच देवाधिपतीले, डेबुजी-तुकळोजी, तुकोबा-ग्यानोबाले, ईंद्रदरबारातल्या ऋषीमुनीले या भुतलावरच्या धार्मिक भक्तीभावाच्या उत्सवाचा ‘धांगळधिंगाना’ मालुम हाये! तरी पन मले भक्ताच्या प्रेमापोटी ‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ असं समजून चिळीचुप बसा लागते ना हो उंदिरमामा!
आतालोग कीतीतरी साधु-संताईनं या लोकोत्सवातल्या नव्यापीळीतल्या युवा लेकराईचे ‘दांगळो’बाज ईचार बदल करासाठी लय भारी टोले घेतले! त्या संताईची अख्खी जीनगानी या प्रबोधनात सरली तरी हे बह्याळबेलने नव्या रगताचे ताकदबाज अरकाट भक्त अजूनबी सुधरले नाईत! ‘संस्कृतीचा धिंगाना पयशाचा दानोळा’ व्हत असला, तरी उरफाट्या शक्तीच्या दांगळोनं खऱ्या भक्तीचा ‘कचरा’ झाला! आधुनिक यंत्रातंत्रापायी, त्या मोबाईलच्या डब्बीपायी भक्त भलकसे कसेच्या कसे बिघळून रायले!
आता पा बरं उंदिरमामा, औंदा आपून सोमवारी भेतभेतच या अरकाट भक्ताईच्या भुतलावर संगमंग येंन्ट्री केली! माया मोम्मी-पोप्पानं जबरदस्तीनं मले अन् तुमाले या भक्ताईले चांगल्या ईचाराची ‘बुद्धी’ वाटाले धाळलं पन या भंटोल भुतलावर आल्यावर पारंपारीक लोकोत्सवातला गयाठेल धांगळधिंगाना पावून भलकसा मीच अचंब्यात पळलो! काय तो डीजे-डाॅल्बीचा कानठया फोळनारा भदाळा अवाज, डोये फुटके करनारी डेजरची लायटिंग, दर्शनाच्या लंब्यासटांग रांगा, युवा पीळीचं बदलेलं ‘वदरुन किर्तन अन् अंदरुन तमाशा’ अशा ईचुकाट्यावानी वाया जायेल ईचार! हा सारा आदयउपटचा तमाशा पावून तं उंदिरमामा मी लयच दु:खी झालो!
ज्या लोकमान्य टिळकानं हा सर्वधर्मसमभावाचा ‘लोकोत्सव’ साऱ्याच समाजाच्या येकजुटीसाठी, देवभक्ती-देशभक्तीच्या संगमासाठी, गावगाळ्यातल्या ‘लोककला’ परंपरा टिकोयासाठी सुरु केला खरा पन आताच्या बेसरम, संस्कृतीहिन नव्यापीळीनं जीवाभावाच्या लोकोत्सवाले भलकोन्त्या ‘धांगळधिंगान्याचं’ रुप आनलं?
जुन्या काळात कीती भक्तीमय वातावरनात, टाळमृदुंग-अभंगाच्या गजरात, संताईच्या किर्तनात, कलापथकाच्या तालासुरात धा दिवस कीती मनाले उल्हास ये! आखरीच्या मिरवनुकीच्या रोजी गोपायकाला महाप्रसाद खावूनपीवून साऱ्या रातभर बैलबंडीच्या रथात बाप्पाले बसोवून, ढोल-झांज्या-पिलमपोयेचा गजर, पुळे डफळ्याच्या तालावर थयथय नाचनारं लेझीम पथक, मंधात लोकजीवनाचं वैभव सांगनारे सोंगं, मल्लखांबावर कसरती दाखानारे ताकदबाज अखाळे, कपायावर गुलालाचा टिका! ना कोन्या पक्षाचे झेंडे, ना कोन्या पक्षाचे रंगिबेरंगी रंगाचे खांद्यावर दुपट्टे, अंधामंदात पारंपारीक वेशभुषेतल्या बायामान्सं, ढोलंझांजीवर ताल धरुन आंगातलं पानी झरेलोग थयथय नाचनारे म्हतारे मान्सं! सारं कसं शिस्तीनं अन् तालासुरात, ‘आमी जातो अमुच्या गावा अन् अमुचा रामराम घ्यावा’ या डोयात पानी आननाऱ्या अभंगाच्या निनादात नदीतल्या कायाभोर पान्यात बाप्पाचं विसर्जन व्हये! पन आताच्या जमान्यातले बुद्धीनं ‘हुकेल’ भक्त सारी ‘खा-प्या’ची सोय लावून अचाट शक्तीचे पोचट प्रयोग दाखोयातच मोठेपना समजतात?
लोकोत्सवाच्या धा दिवसात धा रंगाचे भदाळ्या अवाजाचे डीजे, पाचपक्वान्नाचे निवद, कोनी बाई-बाटलीले आनून धांगळधिंगाना करते तं कोनी मांडवाखाली गंजिफा पीचते! कोनी देवाच्या नावानं वर्गनी करते तं कोनी संद्याकाय झाली का हटेलीत बसून पार्ट्या करते! असा उरफाटा गैरफायदा घ्यातच धन्यता मानते! म्हंजे सारी ‘देवभक्ती’ पयसा कमोवून मंडळाची ‘शक्ती’ दाखोयातच खर्ची व्हते?बापहो, या लोकोत्सवाचा खरा अर्थ त्या काळातल्या संताईनं दाखोला व्हता पन आताच्या पीळीतल्या आधुनिक भक्ताईचा धांगळधिंगाना पावून दरसाल नित्यनेमानं येनारा विघ्नहर्ता देवबाप्पाचीबी मान शरमीनं खाली व्हते!
गळेहो जेवळ्या उल्हासानं देवबाप्पाचं आगमन झालं तेवळ्याच पारंपारीक उल्हासानं बाप्पाचं विसर्जन व्हनं आपल्यासाठी गरजेचं हाये! नाई तं धा दिवसाचा पोटभर उल्हास अन् विसर्जन करताखेपी जथी जागा दिसील त्या गटाऱ्यात, डोबीतल्या पान्यात बाप्पाले टाकू नोका! त्याच्या जयजयकार करता करता परंपरेले जोपासत देवबाप्पाचं विसर्जन करा! संग जुना टाळमृदुंगाचा, ढोल-झांज्याचा थाटबाट अशा पारंपारिक मिरवनुक काढून बाप्पाले निरोप द्या हेच हात जोळून ईनंती हाये! म्हनूनच बुद्धीदेवता विघ्नहर्त्या देवबाप्पा, लाळक्या भक्ताईले उलसीक सुबुद्धी द्या हो देवा!!
अरुण मोडक
९८२२५९३९४७