भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, मात्र हैदराबाद संस्थानातील जनतेला मुक्तीसाठी आणखी तेरा महिने संघर्ष करावा लागला. निजामाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या भूमिकेविरोधात लोकशक्तीने उभारलेल्या लढ्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी यश मिळाले. मराठवाड्याच्या मुक्तीचा हा दिवस राष्ट्रीय एकात्मतेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरला.
स्वातंत्र्य मिळाले; पण हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नव्हते
ब्रिटिश सत्ता संपुष्टात आल्यानंतर संस्थानांच्या भारतात विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी संस्थान स्वतंत्र ठेवण्याची भूमिका घेतली. भारत सरकार आणि हैदराबाद संस्थान यांच्यात वाटाघाटी सुरू राहिल्या. काही काळासाठी ‘जैसे थे’ करार करण्यात आला. मात्र, परिस्थिती गुंतागुंतीची होत गेली. रजाकारांविरुद्ध संघर्ष वाढला. नागरी हक्क, जबाबदार शासन आणि भारतीय संघात सहभागी होण्याची मागणी तीव्र झाली. हैदराबाद स्टेट काँग्रेस, महाराष्ट्र परिषद तसेच विविध सामाजिक व राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी लोकचळवळीला दिशा दिली.
मराठवाड्यात जागृतीची बीजे
मराठवाड्यातील मुक्ती संग्रामामागे अनेक वर्षांची सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जागृती होती. परभणीचे नूतन विद्यालय, औरंगाबादचे सरस्वती भुवन विद्यालय, हिप्परगा येथील शारदा मंदिर, अंबाजोगाईचे योगेश्वरी विद्यालय, उदगीरचे श्यामलाल विद्यालय, लातूरमधील ज्युबिली विद्यालय, बीडचे चंपावती विद्यालय, नांदेडचे प्रतिभा निकेतन आदी संस्थांनी राष्ट्रीय जागृतीला हातभार लावला.
१९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेने चळवळीला संघटित राजकीय स्वरूप मिळाले. निजाम सरकारने बंदी घातल्यानंतर सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांनी नेतृत्व केले. गावागावातील संघर्षांत अनेक अनामिक वीरांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने मुक्ती संग्रामाचा इतिहास अजरामर झाला आणि तो आजही स्मरणात आहे.
आठ जिल्ह्यांची व्यापक लोकचळवळ
आजच्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे आठ जिल्हे आहेत. या संपूर्ण मराठी भाषिक प्रदेशाने हैदराबाद मुक्तीच्या लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला.
दडपशाहीला लोकशक्तीचा प्रतिकार
आंदोलनकर्त्यांना अटक, कारावास आणि दडपशाहीला सामोरे जावे लागले. रजाकारांच्या हिंसक कारवायांमुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या. लोकशाही, नागरी हक्क आणि जबाबदार शासनासाठी जनतेने संघर्ष केला.
निजामाची आणि भारताची भूमिका
भारत सरकारने सुरुवातीला संवाद आणि वाटाघाटींचा मार्ग स्वीकारला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निर्णायक भूमिका घेतली. १३ सप्टेंबर १९४८ रोजी ‘ऑपरेशन पोलो’ सुरू झाले. भारतीय सैन्याच्या कारवाईसमोर हैदराबाद संस्थानाचा प्रतिकार फार काळ टिकला नाही. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती स्वीकारली आणि हैदराबाद राज्य भारतीय संघात सहभागी झाले.
भाषिक वेगळेपणही लक्षणीय ठरले
१९४८ मध्ये भारतीय संघात समाविष्ट झालेले हैदराबाद संस्थान पुढे एकाच राज्याचा भाग राहिले नाही. मराठवाडा महाराष्ट्रात, तेलुगू भाषिक प्रदेश तेलंगणात आणि कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट झाला. भाषावार प्रांतरचनेनंतर मराठवाडा १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचा भाग झाला.
१७ सप्टेंबर : मुक्ती संग्राम दिन
महाराष्ट्र शासनाने ४ मे २००१ रोजी शासन निर्णयाद्वारे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यात ‘मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून कायमस्वरूपी साजरा करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण, स्मृतिस्तंभाला अभिवादन आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. महाराष्ट्र शासन छत्रपती संभाजीनगर येथे १०० कोटी रुपये खर्चून स्मारक उभारत आहे.
इतिहासाचा सन्मान, भविष्याची प्रेरणा
मराठवाडा मुक्ती संग्राम हा लोकशाही, स्वातंत्र्य, नागरी हक्क, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकसहभागाच्या मूल्यांची जाणीव करून देणारा इतिहास आहे. ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, कार्यकर्ते, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांच्या योगदानामुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्याच्या भारतीय संघात विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे हा दिवस केवळ स्मरणाचा दिवस नसून मराठवाड्याच्या देशभक्तीला, लोकशक्तीला आणि भारताच्या एकात्मतेला अभिवादन करण्याचा दिवस आहे.
प्रवीण टाके
छत्रपती संभाजीनगर