कोणत्याही महासत्तेची खरी ताकद तिच्या संयमात असते. हा संयम ढासळला आणि महासत्ता आपल्या ताकदीच्या प्रदर्शनासाठी चित्रविचित्र अंगविक्षेप करू लागली, की शेवटी महासत्ता असूनही ती चेष्टेचा विषय ठरते. ट्रम्प यांनी अमेरिकेची सध्या अशीच अवस्था करून ठेवली आहे. संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचविण्याच्या अट्टाहासापायी ट्रम्प यांनी अमेरिकेची प्रतिष्ठा आणि धाक पार धुळीस मिळवला, असेच म्हणावे लागेल. कारण नसताना ट्रम्प यांनी इराण युद्धात उडी घेतली आणि स्वतःचेच नाक कापून घेतले. आपली सगळी लष्करी ताकद पणाला लावूनही अमेरिकेला इराणचा निर्णायक पराभव करता आलेला नाही. कदाचित या युद्धातून व्हिएतनाम युद्धासारखे अपमानित होऊन अमेरिकेला बाहेर पडावे लागू शकते, अशी परिस्थिती आहे. हाच प्रकार ट्रम्प वारंवार उपसत असलेल्या टेरिफ शस्त्राच्या बाबतीत होत असल्याचे दिसते. आपण टेरिफचा धाक दाखविला, तर सगळे कसे सुतासारखे सरळ होतील आणि आपल्याला हवे तसे व्यापार करार करतील ही ट्रम्प यांची गुर्मी देखील आता पार उतरली आहे. युरोपियन युनियन, चीन वगैरे तर दूर राहिले अगदी भारतासारख्या तिसऱ्या जगातील देश देखील ट्रम्प यांच्या धमकीला भीक घालत नसल्याचे दिसते. आपल्या धमक्यांचा काही फायदा होत नाही, उलट नुकसानच होण्याची शक्यता अधिक आहे हे हळूहळू ट्रम्प यांच्या लक्षात येत असावे आणि म्हणूनच ट्रम्प आता काही देशांसोबत जुळवून घेण्याचा विचार करीत असल्याचे दिसते. त्या काही देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्यासाठी उत्सुक असल्याची बातमी समोर येत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देशाचा प्रमुख आपला अहंकार बाजूला सारत भारताच्या दाराशी येण्यासाठी इतका उत्सुक असण्यामागे काही कारणे निश्चित आहेत. ट्रम्प यांच्या या हतबलतेमागचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताची कणखर भूमिका. ट्रम्प यांनी अनेक प्रकारे दबाव टाकल्यानंतरही भारताने त्यांच्या सोयीनुसार व्यापार करार करण्यास नकार दिला आहे, शिवाय संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेची मक्तेदारी देखील भारताने जवळपास मोडून काढली आहे. भारताने स्पष्ट बजावले आहे, की फायटर जेटसाठी जर ‘जनरल इलेक्ट्रिक’चे (GE) इंजिन द्यायचे असेल, तर ८०% तंत्रज्ञान हस्तांतरित करावेच लागेल. भारत आता फक्त महागड्या परदेशी वस्तूंची खरेदी करणारी बाजारपेठ बनून राहणार नाही. अमेरिकेने जास्तच ताणून धरले, तर भारताकडे ‘साफ्रान’ आणि ‘रोल्स-रॉयस’सारखे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर स्वतःच्या अटी लादण्याचा अमेरिकेचा काळ आता संपला आहे. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताने न घाबरता रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी केली. अमेरिकेला पूर्ण कल्पना आहे, की भारताशिवाय त्यांचे काम चालणार नाही, म्हणूनच वॉशिंग्टन भारतावर कोणतेही निर्बंध लादण्याची हिम्मत करू शकला नाही. इंधन आणि ऊर्जेच्या बाजारातही भारताने आपला स्वाभिमान दाखवून दिला आहे. अमेरिका आणि युरोपने जगावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी केले, स्वतःच्या चलनात आणि पर्यायी पेमेंट सिस्टीमद्वारे व्यवहार केले आणि तेच तेल रिफाईन करून युरोपियन देशांना विकले. अमेरिकेची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे भौगोलिक स्थान. समुद्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेला व दादागिरीला रोखण्यासाठी अमेरिकेला प्रत्येक टप्प्यावर भारतीय नौदलाच्या ताकदीची नितांत गरज आहे. भारताच्या मदतीशिवाय अमेरिका चीनसमोर टिकूच शकणार नाही. त्यामुळे हीच रणनीतिक हतबलता ट्रम्प यांना भारताशी जुळवून घेण्यास भाग पाडत आहे. यासोबतच अमेरिकेचे देशांतर्गत राजकीय समीकरण आणि तेथील निवडणुकीत भारतीय समुदायाचा वाढता प्रभाव हा देखील एक मोठा घटक आहे. ट्रम्प यांना स्वतःचे राजकारण मजबूत करण्यासाठी भारताला दुखावून चालणार नाही. एकूण काय तर नवा आत्मनिर्भर आणि आक्रमक भारत जगाच्या नकाशावर आपले मजबूत स्थान निर्माण करीत आहे. भारताला अमेरिकेसारख्या महासत्तेच्या मदतीची गरज नक्कीच आहे. ही मदत व्यापार आणि लष्करी सहकार्याच्या बाबतीतही तितकीच महत्त्वाची आहे; परंतु त्याचवेळी अमेरिकेलाही भारताची तितकीच नितांत गरज आहे याची जाणीव अमेरिकेला करून देण्यात भारत यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
अग्रलेख
महासत्तेची मजबूरी...!
ट्रम्प यांच्या या हतबलतेमागचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताची कणखर भूमिका.
By :
देशोन्नती डिजीटल »
•