चिखली (Nomadic Certification Campaign) : राज्य शासनाच्या 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या (VJNT) नागरिकांना विविध शासकीय योजनांचा आणि प्रमाणपत्रांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी दि. २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान राज्यभरात विशेष 'भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान' आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत महसूल विभागाने नुकताच शासन परिपत्रकाद्वारे अधिकृत निर्णय जारी केला आहे. या (Nomadic Certification Campaign) विशेष मोहिमेनंतर दर तिमाहाच्या पहिल्या मंगळवारी हे अभियान नियमितपणे राबवले जाणार आहे.
अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये व मिळणारे लाभ
कागदपत्रे व दाखले: मोहिमेदरम्यान नागरिकांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमीलेयर, विवाह नोंदणी आणि दिव्यांग प्रमाणपत्रे जागेवरच उपलब्ध करून दिली जातील.
शासकीय योजनांचा लाभ: आयुष्मान भारत कार्ड, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान सन्मान निधी यांसारख्या योजनांचे थेट वितरण केले जाईल.
वस्तीनिहाय शिबिरे: प्रशासकीय यंत्रणेमार्फत अभियानापूर्वीच वस्तीनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाईल.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाची उपस्थिती:
जिल्हा व तालुका स्तरावर आयोजित होणाऱ्या या शिबिरांचे उद्घाटन संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होईल. या प्रसंगी स्थानिक खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घेतील.
या (Nomadic Certification Campaign) अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा, उपविभाग, तालुका, गाव तसेच नगरपालिका व महानगरपालिकांचा राज्य शासनामार्फत विशेष गौरव करण्यात येणार आहे. विमुक्त व भटक्या जमातीतील पात्र नागरिकांनी या तीन दिवसीय विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.