आपली जबाबदारी ओळखा...आरामशीर राहून चालणार नाही: CM देवेंद्र फडणवीस
नाशिक/ मुंबई (CM Devendra Fadnavis) : नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाल्याने हा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे. दरम्यान, खड्डे बुजवल्यानंतर अवघ्या 24 तासांत पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना फटकारले आहे. "प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. केवळ कार्यालयात बसून चालणार नाही, प्रत्यक्ष कामाची पाहणी करा आणि नागरिकांशी संवाद वाढवा," असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच, खड्डे बुजवण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा, त्यांची पुढील कामे थांबवा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील एका महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेणार असून, त्यावेळी प्रत्यक्ष आणि गुणात्मक सुधारणा दिसली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी महाकुंभ लक्षात घेता अधिक गांभीर्याने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding 'Nashik-Trimbakeshwar MahaSimhastha Kumbh Mela 2027'.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 7, 2026
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Girish Mahajan, Minister Narhari Zirwal, MLA Devyani Pharande, MLA Seema Hiray, MLA Adv. Rahul Dhikale, MLA Saroj Ahire, MLA Hiraman… pic.twitter.com/ZGwcjKpSri
भुजबळ-महाजन वाद पुन्हा चर्चेत
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत, "असं वाईट नाशिक यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं," अशी टीका केली होती. त्यानंतर शहरात "छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा" अशा आशयाचे बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आल्याचे सांगितले जात असून, यामुळे पालकमंत्रीपदाच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे.
महाजनांची सावध भूमिका
सध्या नाशिकची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी या बॅनरबाजीवर सावध प्रतिक्रिया देत, "भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या समर्थकांच्या भावना मी समजू शकतो. मात्र, पालकमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांकडे आहे," असे स्पष्ट केले.
नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आता प्रशासनासह राज्यातील राजकारणही चांगलेच तापले असून, नागरिकांच्या दृष्टीने या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.