लातूर जिल्हा कोरडा दुष्काळ

लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शिवसेनेची मागणी, उद्या लातूरमध्ये धरणे आंदोलन

Latur District Dry Drought: लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह जिल्ह्याच्या इतर अनेक महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यासाठी शिवसेना

लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शिवसेनेची मागणी, उद्या लातूरमध्ये धरणे आंदोलन

Latur District Dry Drought

लातूर (Latur District Dry Drought) : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह जिल्ह्याच्या इतर अनेक महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी (दि.9 सप्टेंबर) लातूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 'तुमसे ना हो पायेगा', ही घोषणा देत सरकारने जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी सोमवारी (दि.7) पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा समन्वय प्रमुख पप्पूभाई कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख बजरंग दादा जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख शंकर रांजणकर, युवा सेना जिल्हाप्रमुख राहुल मातोळकर, शहर प्रमुख माधव कलमुकले आदी उपस्थित होते. 

पावसाळा संपत आला तरी लातूर जिल्ह्यात सरासरीच्या 50 टक्के पाऊस झाला आहे. खरिपाची पिके हातची गेली आहेत. आता पाऊस पडूनही पिके हाती लागणार नाहीत. या संकटामुळे शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केली. 2016 मध्ये लातूरला भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यावेळी रेल्वेने पाणी आणावे लागले. त्या काळात उजनी अथवा माजलगाव धरणातून लातूरला पाणी आणण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली. त्याची व व्यवहार्यता तपासण्याची सूचना केली होती. मात्र पुढे त्याबद्दल काहीच झाले नाही. 2024 मध्ये 259 कोटीच्या लातूरच्या पाणी योजनेसाठी घोषणा करण्यात आली धनेगाव ते हरंगुळ मुख्य पाईप लाईन व पुढील टप्प्यांबाबत शासनाने पुढे काहीही केले नाही. त्यामुळे या घोषणेबाबत शासनाने सार्वजनिक अहवाल द्यावा, अशी मागणी ही रेड्डी यांनी यावेळी केली. 

2016 पासून लातूरबाबत करण्यात आलेल्या सरकारच्या सर्व घोषणा व आश्वासनावर श्वेतपत्रिका काढावी. रेल्वे कोच कारखान्यातील दहा हजार रोजगाराबाबत सरकारने अहवाल जाहीर करावा, सुपर स्पेशलिटी रुग्णालय, लातूर व उदगीरचे नाट्यगृह, लातूर, बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरण, लातूर पानगाव राष्ट्रीय महामार्ग, सोयाबीन व देवणी पशुसंशोधन केंद्र, विमानतळ विस्तारीकरण यासह जिल्ह्याच्या एकूण 24 प्रलंबित प्रश्नांसाठी शिवसेनेचे हे आंदोलन होणार आहे, असे रेड्डी यांनी सांगितले. या आंदोलनात शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले. 

दीड टक्के अंमलबजावणी : कुलकर्णी 
सरकारने लातूर शहर व जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजनांमध्ये आतापर्यंत केवळ दीड टक्के निधी खर्च झाला आहे. सरकारने या योजनांकडे पाठ फिरविल्याचे यातून स्पष्ट होते, असा आरोप यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वय प्रमुख पप्पूभाई कुलकर्णी यांनी केला.