गडचिरोलीच्या दुर्गम भागातील रस्ते आणि आरोग्यव्यवस्थेची विदारक स्थिती पुन्हा उघड
धानोरा (Gadchiroli Healthcare System) : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्यव्यवस्था आणि रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सर्पदंश झालेल्या दिपाली मडावी हिचा जीव वाचवण्यासाठी तिला गडचिरोलीहून हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. नागपूर येथे उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने तिला मूळ गावी धानोरा तालुक्यातील केहकावाही (मुरुमगाव) येथे अॅम्ब्युलन्सने घरी नेण्यात येत होते. मात्र, परतीचा प्रवासही संकटमय ठरला.जंगल परिसरातील खराब आणि चिखलमय रस्त्यामुळे अॅम्ब्युलन्स वाटेतच अडकली.
त्यातच रस्त्यावर झाडे आडवी पडल्याने वाहतुकीचा मार्ग बंद झाला होता. रात्रीच्या वेळी निर्माण झालेल्या या परिस्थितीत डॉ. आशिष कोरेटी आणि त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेत अॅम्ब्युलन्सला धक्का देत चिखलातून बाहेर काढले. तसेच रस्त्यात पडलेली झाडे बाजूला करून रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा केला आणि दिपालीला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचविले.
एका बाजूला जीव वाचवण्यासाठी रुग्णाला हेलिकॉप्टरने नागपूरला न्यावे लागते, तर दुसर्या बाजूला उपचारानंतर घरी परतताना (Gadchiroli Healthcare System) अॅम्ब्युलन्सला चिखलातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांना धक्का द्यावा लागतो, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. दुर्गम भागातील नागरिकांसाठी रस्ते आणि आरोग्यसेवा हा केवळ विकासाचा मुद्दा नसून जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे.
दिपाली सुखरूप घरी पोहोचली, ही दिलासादायक बाब असली तरी या (Gadchiroli Healthcare System) घटनेने प्रशासनाच्या मूलभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दुर्गम गावांना जोडणार्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, पावसाळ्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.