‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...’ गुत्तीच्या दोन जिवलग मित्रांनी करून दाखवले
हणमंत केंद्रे
उदगीर (Graduate Primary Teacher Selection ) : गाव एकच...दोस्ती एकच...स्वप्न एकच...संघर्ष एकत्र अन् आता नोकरीही एकाच जिल्ह्यात!
तालुक्यातील गुत्ती येथील गणेश सूर्यकांत केंद्रे आणि तातेराव व्यंकटराव केंद्रे या दोन जिवलग मित्रांची एकाच वेळी पालघर जिल्ह्यात पदवीधर प्राथमिक शिक्षकपदी निवड झाली आहे. बालपणापासूनची त्यांची घट्ट दोस्ती आता नोकरीच्या नव्या पर्वातही कायम राहणार असल्याने या अनोख्या योगाची गुत्ती परिसरात जोरदार चर्चा आहे. गणेश आणि तातेराव यांची दोस्ती अगदी बालपणापासूनची. एकाच गावचे असल्याने लहानपणापासूनच दोघांची घट्ट गट्टी होती. सुख-दुःख असो, अडचण असो किंवा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय—दोघे एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
शिक्षणाचा प्रवास पुढे सरकत असताना (Graduate Primary Teacher Selection) दोघांनीही शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. डी.एड.नंतर शिक्षक भरतीसाठी दोघांनी तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात दोघेही कटऑफच्या जवळ पोहोचले; मात्र निवड झाली नाही. प्रतीक्षा यादीत राहावे लागले. संधी हुकली, पण दोस्तीची साथ मात्र सुटली नाही. दोघांनी पुन्हा प्रयत्न सुरू केला. अभ्यास करताना एकमेकांना धीर देत, अडचणींवर चर्चा करत आणि ‘यावेळी आपली निवड झालीच पाहिजे’ या निर्धाराने दोघे पुढे जात राहिले. याही प्रयत्नात दोघांचे गुण जवळपास समान राहिले आणि पुन्हा एकदा कटऑफच्या उंबरठ्यावर येऊन ते थांबले.
दोनदा संधीने हुलकावणी दिली; पण या दोन मित्रांनी हार मानली नाही. अखेर काल जाहीर झालेल्या यादीत त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. गुत्ती गावचे गणेश केंद्रे आणि तातेराव केंद्रे या दोघांचीही एकाचवेळी पालघर जिल्ह्यात पदवीधर प्राथमिक शिक्षकपदी निवड झाली. विशेष म्हणजे एकाच गावात वाढलेले हे दोन मित्र आता नोकरीसाठीही एकाच जिल्ह्यात जाणार आहेत. गुत्तीच्या मातीत बालपण गेले, त्याच मातीत मैत्रीची वीण घट्ट झाली आणि आता नोकरीच्या निमित्ताने दोघे पालघर जिल्ह्यात एकत्र जाणार आहेत. गाव बदलले, जबाबदाऱ्या बदलल्या; पण दोस्तीचा सोबती मात्र कायम राहिली.
‘शोले’ चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...’ या गाजलेल्या गीताची आठवण या दोघांच्या मैत्रीने करून दिली आहे. कारण दोस्ती केवळ गप्पा आणि आठवणींपुरती मर्यादित न राहता अपयशाच्या काळात एकमेकांना उभे करण्यापासून ते यशाच्या क्षणी एकत्र उभे राहण्यापर्यंत पोहोचली आहे. एकाच गावचे दोन जिवलग मित्र... दोनदा अपयशाच्या उंबरठ्यावरून परतले... पुन्हा लढले... अन् अखेर एकाचवेळी एकाच जिल्ह्यात शिक्षक झाले आहेत. गणेश आणि तातेराव यांच्या या दोस्तीची आणि यशाची कहाणी सध्या गुत्तीकरांसाठी अभिमानाचा विषय ठरली आहे.