नवी दिल्ली (El Nino Effects) : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यातच आता सुपर एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या तीव्र उष्णतेचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सप्टेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत जगभरात उष्णतेशी संबंधित सुमारे साडेचार लाख अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात, असा अंदाज नव्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
‘क्लायमेट इम्पॅक्ट लॅब’ या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हवामान बदल आणि तीव्र हवामानाच्या घटनांचा जगभरातील नागरिक, अर्थव्यवस्था आणि समुदायांवर होणारा परिणाम याचा संस्थेकडून अभ्यास केला जातो.
अहवालानुसार, ग्लोबल साउथमधील देशांना एल निनोमुळे (El Nino Effects) निर्माण होणाऱ्या उष्णतेचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतात सुमारे 15,800 अतिरिक्त मृत्यू, तर ब्राझीलमध्ये सुमारे 13,300 अतिरिक्त मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अहवालातील हे आकडे थेट भविष्यवाणी नसून अंदाज आहेत. 1996 ते 2025 या कालावधीतील मृत्यूंच्या आकडेवारीचा विचार करून अतिरिक्त मृत्यूंचा संभाव्य आकडा मांडण्यात आला आहे. जागतिक तापमान सामान्य पातळीपेक्षा सुमारे 1.2 अंश सेल्सिअसने अधिक राहिल्यास उष्णतेशी संबंधित मृत्यू वाढण्याची शक्यता अहवालात नमूद करण्यात आली आहे.
उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजनांची गरज
उष्णतेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित देशांच्या सरकारांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये उष्णतेच्या लाटेचे पूर्वसूचना इशारे, कुलिंग सेंटरची व्यवस्था, पुरेशा पाण्याची उपलब्धता, बाहेर काम करणाऱ्या कामगारांचे संरक्षण आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणे, अशा उपायांचा समावेश आहे. अहवालातील अंदाजामुळे आगामी काळात अतिउष्णतेच्या परिणामांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पूर्वतयारीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.