वाशिमच्या कारंजा लाड तालुक्यात पाहणी; पीकविम्याचे पैसे देण्याचेही मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई/वाशिम : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोरड्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) उद्या काढण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासोबतच पीकविम्याचे पैसे देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री सध्या मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या पाहणीदरम्यान अनेक भागांमध्ये जलसाठे आटल्याचे आणि शेतीसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर काढण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल आणि पीकविम्याशी संबंधित रक्कमही दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान
राज्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाअभावी आणि वाढलेल्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. काही शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पिके नांगरून टाकली, तर काहींनी शेतातील पिके जाळण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचीही माहिती समोर आली आहे.
दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. विरोधकांनीही सरकारकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा सुरू केला असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकस्थिती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर
दुष्काळ पाहणीदरम्यान केवळ शेतीचे नुकसानच नव्हे, तर जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
आता शासनाकडून या मागणीवर काय निर्णय घेतला जातो, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे स्वरूप आणि रक्कम काय असेल, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे पुढील मदत आणि उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.