उदगीर (Court fraud case) : येथील प्रथमवर्ग न्यायालयात सुरू असलेल्या नियमित फौजदारी खटल्यात मूळ आरोपीच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदारी खटला क्रमांक ८५/२०१७ (शासन विरुद्ध विश्वनाथ काळवणे) या प्रकरणात आरोपी विश्वनाथ लिंबाजी काळवणे (वय ६२, रा. हंडरगुळी, ता. उदगीर) यांच्या जागी आरोपी बालाजी ज्ञानेश्वर वागलगावे (वय ३४, रा. राचनावाडी, ता. चाकूर) हा व्यक्ती न्यायालयात हजर झाला. त्याने आपणच विश्वनाथ लिंबाजी काळवणे असल्याची बनावट ओळख धारण केल्याचा आरोप आहे.
ही बनावट ओळख भीमाशंकर शिवाजी रायफळे (रा. मांडोळ, ता. चाकूर) आणि आरोपी आंबेकर वकील (रा. हाळी, ता. उदगीर) यांच्या सांगण्यावरून वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तिघांनी संगनमत करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा आरोप पोलिस तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान, उदगीर येथील न्यायालयात घडल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
न्यायालयाचा आदेश (Court fraud case) प्राप्त झाल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार अशोक बिराजदार यांनी ३ सप्टेंबर रोजी उदगीर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१९, ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार उस्तुर्गे करीत आहेत. न्यायालयातच बनावट ओळख वापरून मूळ आरोपीच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला उभे केल्याच्या आरोपामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.