नितीन देशमुख यांच्याकडे संपर्क उपनेतेपदाची जबाबदारी
चिखली (Buldhana Lok Sabha Shivsena) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखांच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी पुन्हा एकदा प्रा. नरेंद्र खेडेकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर संपर्क उपनेते म्हणून बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडे (बुलढाणा, अकोला, अमरावती) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, राज्यभरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पक्षाने पुन्हा दाखवला विश्वास
प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी यापूर्वीही (Buldhana Lok Sabha Shivsena) बुलढाणा जिल्ह्यात पक्षसंघटन वाढवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख ते आता जिल्हा संपर्कप्रमुख असा त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास राहिला आहे. १९९५ मधील युती सरकारच्या काळातही त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवलेली असून जिल्ह्यात ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खंबीर आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात.