दिग्गजांना मागे टाकत ठरला सर्वात वेगवान फलंदाज
नवी दिल्ली/ मुंबई (Abhishek Sharma Record) : भारताचा युवा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत भारतीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अभिषेकने अवघ्या 3420 चेंडूंमध्ये 6000 टी-20 धावा पूर्ण करत भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात वेगाने हा टप्पा गाठण्याचा मान मिळवला. सामन्यापूर्वी अभिषेकला टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्यासाठी केवळ पाच धावांची गरज होती. अफगाणिस्तानचा गोलंदाज फजलहक फारुकीच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.
दिग्गजांना टाकले मागे
चेंडूंच्या संख्येनुसार 6000 टी-20 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आता जगातील आघाडीच्या फलंदाजांमध्ये पोहोचला आहे. या बाबतीत त्याच्यापुढे केवळ न्यूझीलंडचा फिन अॅलन असून त्याने 3386 चेंडूंमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेलने 3550 चेंडूंमध्ये, तर टिम डेविडने 3681 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला होता. त्यामुळे अभिषेकने रसेल आणि टिम डेविडसारख्या स्फोटक फलंदाजांनाही मागे टाकले आहे.
विक्रमानंतर आणखी आक्रमक फलंदाजी
6000 धावांचा टप्पा पार केल्यानंतर (Abhishek Sharma) अभिषेकची फलंदाजी आणखी आक्रमक झाली. त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला आणि केवळ 22 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने अखेर 32 चेंडूंमध्ये 82 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या डावात 7 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारतासाठी 157 धावांचे लक्ष्य सहजसाध्य ठरले.
ईशान किशनचीही महत्त्वपूर्ण साथ
भारताला सुरुवातीलाच संजू सॅमसनच्या रूपाने धक्का बसला. मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma आणि ईशान किशन यांनी डाव सावरत धावगतीही कायम ठेवली. ईशान किशनने 33 चेंडूंमध्ये 42 धावा करत अभिषेकला चांगली साथ दिली. या दोघांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. अखेर भारताने 13.4 षटकांत 157 धावांचे लक्ष्य पूर्ण करत 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अभिषेक शर्माच्या या विक्रमी कामगिरीमुळे भारतीय टी-20 क्रिकेटला आणखी एक आक्रमक आणि विश्वासार्ह फलंदाज मिळाल्याची चर्चा रंगली आहे.