सरकारच्या जीआरची केली होळी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी लाखांची मदत देण्याची मागणी
लातूर (Revolutionary Hallabol Andolan) : राज्य सरकारने दुष्काळाबाबत जीआर काढला, परंतु अद्याप आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. या जीआर मधून सरकारने शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिल्याचा आरोप करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लातुरात हातात भोपळा आणि गाजर घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या दुष्काळ संदर्भातील जीआरची होळीही करण्यात आली.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने काही दिवसापूर्वी दुष्काळाच्या संदर्भाने एक जीआर काढला आहे. या जीआर मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. आज शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची गरज असताना याकडे अद्यापही सरकारचे दुर्लक्ष आहे. हा जीआर फसवा असून सरकारने शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिला आहे असा आरोप संघटनेने यावेळी केला.
या (Revolutionary Hallabol Andolan) आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल, कोअर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी, प्रज्योत हुडे, नवनाथ शिंदे, श्रीराम चलवाड, मयुर चव्हाण, धनंजय घुटे, नितीन नाईकवाडे, बादल शिंदे, दत्ता किणीकर, विशाल ढोबळे, निलेश बिराजदार, बालाजी शिंदे, रामेश्वर जंगाले यांच्यासह मोठ्या शेतकरी सहभागी झाले होते.
अशा आहेत मागण्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे विशेष अनुदान द्यावे, तसेच २०२४ आणि २०२५ मधील प्रलंबित पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी आणि २०२६ च्या पीकविम्याची नियमानुसार तातडीने अदा करावी, शेतमजुरासाठी आर्थिक पॅकेज द्यावे, जनावरांसाठी दावणीला चारा आणि पिण्याच्या पाण्यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले.