शेतकऱ्यांकडून तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (Marathwada Drought Crisis) : मराठवाड्यात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. परभणीसह बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील अनेक भागांत सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी आदी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. (Marathwada Drought Crisis) मराठवाड्यात यंदा पावसाची सुमारे २५ टक्के तूट नोंदवली गेली असून, अनेक भागांत पावसाचा खंड तीन ते सहा आठवड्यांपर्यंत वाढला आहे.
परभणीत परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून सेलू तालुक्यात शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडली, तर मानवत तालुक्यात सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्यात आला. पूर्णा तालुक्यातही दीड महिन्याच्या खंडामुळे सोयाबीन, मूग, उडीद व तुरीची पिके करपली आहेत. बीडच्या धारूर तालुक्यात सुमारे ४२ हजार हेक्टरवरील पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. (Marathwada Drought Crisis) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयाबीनचा फुलोरा गळत असून कपाशी, मूग व बाजरीची वाढ खुंटली आहे. जालना आणि बीडमध्येही सोयाबीन, कापूस व तुरीची अवस्था चिंताजनक आहे.
पाणी, चारा संकटाची चाहूल
जलसाठ्यांमध्ये अपेक्षित पाणीसाठा नसल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. (Marathwada Drought Crisis) विविध पक्ष, शेतकरी संघटना व लोकप्रतिनिधींनी तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून पीकविमा, आर्थिक मदत, चारा छावण्या व रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ८ ते १२ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे; मात्र हा पाऊस पिकांना कितपत दिलासा देतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.