तोडग्याशिवाय हटणार नसल्याचा आक्रमक पवित्रा
चिखली (Chikhli Farmers' Protest) : महावितरणच्या मनमानी कारभाराचा आणि हलगर्जीपणाचा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला आहे. मुबलक पाऊस होऊन विहिरी तुडूंब भरलेल्या असताना केवळ वीज मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाळू लागली आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या चिखली तालुक्यातील तब्बल १५ गावांतील शेतकऱ्यांनी आज सकाळी ८ वाजेपासून मंगरूळ नवघरे येथील ३३/११ केव्ही महावितरण उपकेंद्रावर धडक देऊन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.
विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिके सुकली
यंदाच्या हंगामात परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरी आणि कूपनलिकांना चांगले पाणी आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून कृषी पंपांचा वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. दहिगाव, मंगरूळ नवघरे, पांढरदेव, घानमोड, मानमोड, करतवाडी, वरखेड, नायगाव खुर्द, नायगाव बुद्रुक, पेनसावंगी, सावरखेड, उत्रदा दहिगाव शिवार आणि डोंगरगाव परिसरातील सोयाबीन, कापूस व तुरीची पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. डोळ्यादेखत पिके वाळत असल्याने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी उपकेंद्रावर धडक दिली.
महावितरणच्या ढिसाळ कारभारावर संताप
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सकाळी आंदोलन सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क साधण्यात आला, परंतु दुपारी १ वाजेपर्यंत एकही जबाबदार अधिकारी फिरकला नाही. यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक अधिकच वाढला. "थकबाकी वसुलीसाठी शेतात येऊन कनेक्शन कापणारे महावितरणचे अधिकारी नियमित वीज देण्याच्या वेळी मात्र गायब असतात," असा घणाघाती आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
कार्यकारी अभियंत्यांची धाव, पण शेतकरी ठाम
आंदोलन (Chikhli Farmers' Protest) चिघळत असल्याचे लक्षात येताच अखेर महावितरणचे कार्यकारी अभियंता चव्हाण हे स्वतः दुपारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून समस्येवर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनांवर बोळवण न करता प्रत्यक्ष वीजपुरवठा पूर्ववत होत नाही आणि मागण्यांचे लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत उपकेंद्र सोडणार नाही, असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
१५ गावांतील खंडित झालेला कृषी वीजपुरवठा विनाविलंब पूर्ववत करण्यात यावा.
शेतीकामासाठी दिवसा सलग ८ तास पूर्ण दाबाने (हाय व्होल्टेज) वीज उपलब्ध करून द्यावी.
वारंवार जळणारे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि लटकणाऱ्या जुनाट वीजवाहिन्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले असून, उपकेंद्र परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.