दैठणा पोलिसांची कारवाई; चोरीच्या गुन्ह्यांची उकल
दैठणा (Daithana Police Action) : डफवाडी शिवारातील शेतातून मोटारचे वायर चोरी गेल्याच्या प्रकरणात दैठणा पोलिसांनी तपास करत चोरट्यांना ताब्यात घेतले. वायर वितळवून मिळविलेले दोन किलो तांबे तसेच विक्रीतून मिळालेली पंधरा हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल दैठणा पोलिसांनी जप्त केला आहे. एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, दैठणा पोलीस ठाणे हद्दित मोटार वायर चोरी संदर्भात गुन्ह्याची नोंद झाली होती. सपोनि. गोपी सोनेत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. तपासा दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून तांब्याची तार, वायर विक्रीतून मिळालेली रोकड हस्तगत करण्यात आली. सदर प्रकरणात दैठणा पोलिसांनी अंकुश मुंजाजी ढगे, बालाजी वामन पवार, रविंद्रसिंग भोलासिंग टाक, शैलेश किरण कांबळे, किरण रामा गुजर यांना ताब्यात घेतले.
तसेच शाहरुख खान रहिम खान पठाण याचाही सदर प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस हवालदार ज्ञानेश्वर चोपडे, पोलीस अंमलदार दत्ता जगताप, श्रीरंग डुकरे यांच्या पथकाने केली.