सव्वा लाखांची रोकड, सुमारे पावणेदोन लाखांचे सोने लंपास;
चार संशयित सीसीटीव्हीत कैद, पंचमुखी महादेव परिसरात पोलीस चौकीची मागणी
चिखली (Chikhali-Shahunagar Burglary) : शहरातील शाहूनगर तसेच पंचमुखी महादेव मंदिर परिसरात रविवारी (१४ सप्टेंबर) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला. एकापाठोपाठ एक अशा तब्बल सहा ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात हत्यारे असलेले चार संशयित कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर या टोळीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, (Chikhali-Shahunagar Burglary) चोरट्यांनी शाहूनगर व पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील अनेक घरांना लक्ष्य केले. याच रात्री चोरट्यांनी इंगळे सर, अनिल सोनुने, संजय अंभोरे आणि माधव कुंडलिक गायकवाड यांच्या घरांनाही लक्ष्य केले. सुधाकर काळे यांचे गोडाऊनही फोडण्यात आले. शाहूनगरातील तिरमारे यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
लोखंडी कपाटाचे दोन्ही लॉक तोडून ७० हजारांचा ऐवज लंपास
पंचमुखी महादेव मंदिराजवळ राहणारे माधव कुंडलिक गायकवाड (वय ३२, व्यवसाय मजुरी, मूळ रा. देऊळगाव कोळ, ता. सिंदखेड राजा, सध्या रा. पंचमुखी महादेव मंदिराजवळ, वार्ड क्र. ६, चिखली) यांच्या घरातही चोरट्यांनी चोरी केली. १४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १.०० ते २.४५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. महादेव पंढरीनाथ शेगोकार हे घरात झोपलेले असतानाच चोरट्यांनी मागील खोलीकडून प्रवेश केला. घरातील व्यक्तींना जाग येऊ नये, याची काळजी घेत चोरट्यांनी मागील खोलीचा दरवाजा टॉमीच्या साहाय्याने उघडला आणि घरातील सुमारे सव्वा लाख रुपये रोख तसेच जवळपास पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची माहिती आहे. चोरट्यांच्या हालचालीदरम्यान आवाज झाल्याने गायकवाड यांना जाग आली; मात्र अवघ्या पाच ते सात मिनिटांत चोरट्यांनी आपला डाव साधत तेथून पलायन केले. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी गायकवाड झोपलेल्या खोलीचा दरवाजा आतून लावून घेतल्याचेही सांगण्यात येते.
बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दोन्ही लॉक तोडून कपाटातील सोन्याची मंगळसूत्र पोत, वजन ७ ग्रॅम, अंदाजे किंमत ३५ हजार रुपये, सोन्याचे फुल, वजन ३ ग्रॅम तसेच सोन्याची अंगठी, वजन ५ ग्रॅम, अंदाजे किंमत एक लाख 75 हजार रुपये नगदी सव्वा लाख रुपये असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी माधव कुंडलिक गायकवाड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अप.क्र. ७५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ व ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार संशयित सीसीटीव्हीत कैद
चोरीच्या या घटनांमध्ये सहभागी असलेल्या संशयितांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. संजय अंभोरे आणि तिरमारे यांच्या घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तिरमारे यांच्या घराला पडदा असल्याने घर बंद असल्याचा अंदाज चोरट्यांना आला असावा. त्यांनी भिंतीवरून चढून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेरून घराला कुलूप नसल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.
याच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार संशयित तोंडाला रुमाल बांधून, हातात हत्यारे घेऊन परिसरात वावरताना दिसत आहेत. काही फुटेजमध्ये ते घराच्या भिंतीवरून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना स्पष्टपणे कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, कॅमेऱ्यात काही संशयितांनी अंगावरील बहुतांश कपडे काढलेले दिसत असून ते केवळ अंडरवेअर आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यांच्या अंगावर तेल लावलेले असावे, असेही सीसीटीव्ही फुटेजवरून प्रथमदर्शनी दिसून येते. पोलिसांकडून या फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.
श्वानपथक, न्यायवैद्यकीय पथकाकडून पाहणी
घरफोडीच्या घटनांची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी श्वानपथक तसेच न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून गेल्याची माहिती आहे. घटनास्थळावरून मिळणारे ठसे, इतर पुरावे तसेच सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही
वारंवार चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती
शाहूनगर परिसरात यापूर्वीही अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार याच परिसराला चोरटे लक्ष्य करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी चोरट्यांचा वावर वाढत असल्याने पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणेवर लक्ष ठेवावे आणि संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पंचमुखी महादेव मंदिर परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने येथे स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष परीहार यांनी केली आहे. परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकीची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी झाल्याने चिखली शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सीसीटीव्हीत कैद झालेल्या चार संशयितांना पोलिस कधी जेरबंद करतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.