उदगीर अहमदपूर बसमधील प्रकाराने संताप;
ऑनलाइन पोलिस तक्रार, एसटी प्रशासनाच्या चौकशीकडे लक्ष
उदगीर (Udgir ST E-Card) : ई-कार्ड मशीन बंद असल्याच्या कारणावरून उदगीर-अहमदपूर एसटी बसमध्ये प्रवासी आणि वाहकात झालेला वाद चांगलाच पेटल्याचा आरोप आहे. या वादात वाहकाने प्रवाशांना तसेच त्यांच्या आई-बहिणींविषयी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि चार वृद्ध प्रवाशांना बसमधून उतरवले, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे. या प्रकारामुळे एसटीच्या प्रवासी सेवेत कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एमएच १३ सीयू ८६०७ क्रमांकाची बस सोमवारी सकाळी उदगीरहून अहमदपूरकडे जात होती. चार प्रवाशांकडे ई-कार्ड होते. मात्र मशीन तांत्रिक कारणामुळे सुरू होत नसल्याचे वाहकाने सांगून पूर्ण तिकीट घेण्यास सांगितले. कार्डमध्ये पैसे उपलब्ध असल्याचे सांगत प्रवाशांनी मशीन तपासण्याची विनंती केली. यावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर कथित शिवीगाळीत झाले.
प्रवाशांच्या आरोपानुसार, वाहकाने अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. संबंधित सरकारी योजनेबाबत तसेच ती सुरू करणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दलही अपशब्द वापरल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे, चारही प्रवासी वृद्ध असून त्यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले. वादानंतर प्रवाशांना तोंडार क्रॉसिंग येथे बसमधून उतरवण्यात आले, असा आरोप आहे. तेथपर्यंतचे तिकीट रोख रकमेने देण्यात आल्याचेही प्रवाशांनी सांगितले.
या घटनेनंतर प्रवाशांनी ऑनलाइन पोलिस तक्रार नोंदविल्याचे सांगितले. ई-कार्डची तांत्रिक अडचण ही प्रवाशांची चूक नसताना त्याचा राग वृद्ध प्रवाशांवर काढण्यात आला का? असा सवाल उपस्थित होत असून, एसटी महामंडळाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोप खरे ठरल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
“प्रवाशांकडून प्राप्त झालेल्या व्हिडीओची तपासणी करण्यात आली असून, त्यातील प्रकाराच्या अनुषंगाने संबंधित वाहकाबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे,” अशी माहिती उदगीर आगारप्रमुख अजय गायकवाड यांनी दिली.
दिवसभर समाजमाध्यमांवर व्हिडीओची चर्चा
उदगीर-अहमदपूर एसटी बसमधील कथित वादाचा व्हिडीओ सोमवारी दिवसभर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओची शहरासह प्रवासीवर्गात जोरदार चर्चा रंगली होती. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रकारावरून नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रवाशांशी वर्तनाचा मुद्दाही चर्चेत आला.