वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर उदगीर शहर पोलिसांत तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल
उदगीर (Udgir Doctor Crime Case) : उपचारादरम्यान चुकीची औषधे देऊन निष्काळजीपणा केल्याने महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून उदगीर शहर पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. ईसा खान (रा. परभणीकर दवाखाना, चौबारा रोड, उदगीर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०४(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता नारायण राठोड (वय ३३, रा. भगीरथराजा नगर, जळकोट रोड, उदगीर) यांच्यावर २६ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास परभणीकर हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले होते. उपचारादरम्यान चुकीची औषधे देऊन निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्या पती नारायण हरिसिंग राठोड यांनी केला आहे.
या घटनेनंतर आकस्मिक मृत्यू क्रमांक २२/२०२३ अन्वये चौकशी सुरू होती.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील वैद्यकीय अधिकारी समितीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर तसेच फिर्यादीने २१ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.४३ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कारवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.