देसाईगंज येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन
कोरची (BJP Yuva Morcha) : नगरपरिषद सांस्कृतिक भवन, देसाईगंज (वडसा) येथे झालेल्या आढावा बैठकीत कोरची तालुक्यातील कोटगुल व परिसरातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित व गंभीर प्रकरणांबाबत भाजप युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी निवेदनाचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विषयांवर उच्चस्तरीय विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी भाजप कोरची तालुक्याचे तालुकाध्यक्ष सदाराम नुरुटी, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अविनाश हारामी, . नारद फुलारे, दिलीप कोवाची, रामलाल मुलेटी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
१. आश्रमशाळा विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण : शासकीय आश्रम शाळा, कोटगुल येथील इयत्ता ९ वीच्या आदिवासी मुलीच्या मृत्यूस जबाबदार अधीक्षिका, कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र, कोटगुल येथील डॉक्टरांची निष्पक्ष उच्चस्तरीय विभागीय चौकशी करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
२. LAMPS सचिव गैरव्यवहार प्रकरण : LAMPS, कोटगुल येथील सचिवाने वनपट्टेधारक शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन न केल्याने शेकडो शेतकरी धान बोनसपासून वंचित राहिले. दोषी सचिवाला तात्काळ निलंबित करून FIR दाखल करावा व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण चौकशी करावी.
३. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण : बोगस आदिवासी जात प्रमाणपत्राद्वारे नोकऱ्या व योजना लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई व सेवेतून बडतर्फीची कारवाई करावी.
यासोबतच कोटगुल परिसरातील ३० खाटांचे प्रलंबित रुग्णालय, ZP शाळेतील रिक्त पदे, वनहक्क पट्टे, रस्ते, वीज व बस सेवा या विकास कामांबाबतही तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन या गंभीर प्रकरणांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने प्रदेश पातळीवरून न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.