शहापूर तालुक्यातील आटगाव येथील घटना; त्र्यंबकेश्वरहून मुंबईकडे जात असताना काळाचा घाला
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव येथे इर्टिगा कार आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या दुर्घटनेत कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इर्टिगा कारमधून प्रवास करणारे हे सर्वजण त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परतत होते. आटगाव परिसरात कार आली असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की, कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या अपघातातील मृतांची नावे श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल अशी आहेत. तर सुभी जैस्वाल, शिवम जैस्वाल, हाशिक जैस्वाल, सुनीता जैस्वाल, राधिका जैस्वाल आणि सतीश जैस्वाल हे सहा जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त इर्टिगा कार जोगेश्वरी येथील असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.