लातूर (SwarBrahma Award) : धायरी येथे नुकताच संपन्न झालेला स्वरब्रह्म संगीत महोत्सव २०२६ उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात पार पडला. या महोत्सवात मराठवाड्यातील सुप्रसिद्ध तबलावादक स्वर्गीय संजय सुवर्णकार यांना मरणोत्तर ‘स्वरब्रह्म पुरस्कार’, सन्मानपत्र व ₹११,००० रोख रक्कम देऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गायक व संगीतकार अंगद गायकवाड, बापुराव चामनर, डॉ. आसाराम दोडतले, चंद्रकला खोसे, प्रकाश खंडाळे आणि शोभा शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
स्वरब्रह्म कला अकादमी (SwarBrahma Award) व संगीत विद्यालयातील ५० हून अधिक विद्यार्थी कलाकारांनी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भक्तिगीते, भावगीते, गझल, तराना, रागमाला, तबला जुगलबंदी तसेच हार्मोनिअम-कीबोर्ड वादनाची जुगलबंदी सादर करून रसिकांची मने जिंकली.
दुसऱ्या सत्रात स्व. संजय सुवर्णकार यांच्या कुटुंबीयांचा मरणोत्तर ‘स्वरब्रह्म पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच बालकलाकार सई चौरे हिला ‘कलासाधक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अकादमीतील समीर सावंत, अंश पाटील, संजय कोकरे आणि प्रथा हिंगणे यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला.
स्व. संजय सुवर्णकार यांची कन्या व शिष्या जान्हवी सुवर्णकार हिने तीनतालातील तबला सोलो सादर करून रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर मी होणार सुपरस्टार पर्व ४ या कार्यक्रमातील अंतिम फेरीतील स्पर्धक गंधर्व चामनर यांनी राग यमन आणि ‘याद पिया की आये’ ही पारंपरिक ठुमरी सादर केली. समारोपाला शिवजी चामनर यांनी राग मारूबिहाग तसेच ‘श्याम सुंदर मदन मोहन’ ही भैरवी सादर करून महोत्सवाची सांगता केली.
संपूर्ण महोत्सवात (SwarBrahma Award) भरत चव्हाण (तबला), प्रतिक कोतिवडेकर (हार्मोनिअम), संदीप सोनावणे (पखावज), सचिन खंडागळे (तालवाद्य), आकाश मालीकर व ऋषीकेश कांबळे (गिटार) यांनी साथसंगत केली. मेघा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर दत्तात्रय सावंत, महेश माने, गोविंद कांबळे आणि ओंकार गौड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सहभागी कलाकार, पालक, अतिथी आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महोत्सव अविस्मरणीय ठरला.